IPO पूर्वी झेप्टोवर ईडीची नजर; परदेशी गुंतवणुक प्रकरणी चौकशी

कंपनीने केला मोठा खुलासा

IPO पूर्वी झेप्टोवर ईडीची नजर; परदेशी गुंतवणुक प्रकरणी चौकशी

क्विक-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी झेप्टोने (Zepto) आपल्या अद्ययावत ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मध्ये खुलासा केला आहे की, कंपनीचे संस्थापक आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा यांना यावर्षी एप्रिल महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याच काळात कंपनी आपल्या बहुचर्चित ८,०१० कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्री (IPO) ची तयारी करत होती.

फाइलिंगनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी ईडीने समन्स जारी करून कंपनी आणि तिच्या संस्थापकांकडून परदेशी गुंतवणूक, आर्थिक वर्ष २०२०-२१ पासूनचे लेखापरीक्षित आर्थिक अहवाल, भागधारकांची रचना, कर्जे व हमी, आयकर विवरणपत्रे, बँक खात्यांची माहिती, स्थावर मालमत्ता आणि कंपनीच्या व्यवसाय मॉडेलशी संबंधित माहिती मागवली होती. DRHP मध्ये नमूद करण्यात आले आहे की, कैवल्य वोहरा १७ आणि २२ एप्रिल रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते, तर आदित पलिचा यांनी २० एप्रिल आणि १५ मे रोजी एजन्सीच्या प्रश्नांची उत्तरे दिली. चौकशीदरम्यान दोन्ही संस्थापकांनी ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती सादर केली. याशिवाय कंपनीची होल्डिंग संरचना, स्कीम ऑफ अरेंजमेंट, विविध व्यावसायिक करार आणि चलनांशी (Invoices) संबंधित अतिरिक्त माहितीही ईडीला देण्यात आली.

झेप्टोने आपल्या फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, कागदपत्रे सादर केल्यानंतर कंपनी किंवा तिच्या संस्थापकांना ईडीकडून कोणतीही नवीन नोटीस किंवा पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही. तथापि, भविष्यात या प्रकरणाशी संबंधित नव्या चौकशा, कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक प्रक्रिया होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही कंपनीने संभाव्य गुंतवणूकदारांना सूचित केले आहे.

IPO पूर्वी गुंतवणूकदारांचे लक्ष

झेप्टो भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी ८,०१० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. ही रक्कम नवीन समभाग जारी करून उभी केली जाणार आहे. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील IPO पैकी हा एक मानला जात आहे. ईडी समन्सशी संबंधित हा खुलासा गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कोणतीही नियामक अथवा चौकशीसंबंधित घडामोड कंपनीच्या मूल्यांकनावर आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम करू शकते.

हे ही वाचा:

अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ओमान किनाऱ्याजवळून २४ भारतीय खलाशांची सुटका

मोदींनी नेहरूंना टाकले मागे; सर्वाधिक काळ पंतप्रधान

कोचिंग सेंटर गोळीबार प्रकरणात खान सरांच्या अटकेला स्थगिती

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनापूर्वी झालेल्या हिंसक संघर्षात ११ ठार

अद्ययावत DRHP मध्ये कंपनीच्या भक्कम आर्थिक कामगिरीचाही उल्लेख करण्यात आला आहे. झेप्टोने आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मध्ये २४,१६४ कोटी रुपयांचा परिचालन महसूल नोंदवला असून, तो मागील आर्थिक वर्षातील ११,१०९ कोटी रुपयांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. कंपनीचा निव्वळ तोटाही लक्षणीयरीत्या कमी झाला असून तो FY25 मधील १,९५३.७ कोटी रुपयांवरून FY26 मध्ये १,२४८.६ कोटी रुपयांवर आला आहे.

Exit mobile version