उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये मोठे यश आले असून बब्बर खालसा इंटरनॅशनलशी (BKI) संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कौशंबी येथून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता. दहशतवादी लाजर मसीहला पहाटे ३.२० वाजता अटक करण्यात आली. तो पंजाबमधील अमृतसरमधील रामदास भागातील कुर्लियान गावचा रहिवासी आहे.
अमृतसरचा रहिवासी लाजर मसीह हा गेल्या वर्षी न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता. अतिरिक्त पोलिस महासंचालक (यूपी स्पेशल टास्क फोर्स, कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी सांगितले की, कौशांबीच्या कोखराज पोलिस ठाणे परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. अमिताभ यश म्हणाले की, उपलब्ध माहितीनुसार अटक करण्यात आलेला दहशतवादी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या (BKI) जर्मनीस्थित मॉड्यूलचा प्रमुख स्वर्ण सिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करतो. तो पाकिस्तानस्थित आयएसआय कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात असल्याचीही माहिती आहे.
उत्तर प्रदेश एसटीएफला दहशतवाद्यांकडून काही स्फोटके आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात यश आले आहे. या वस्तूंमध्ये तीन हँडग्रेनेड, दोन डेटोनेटर्स, एक परदेशी पिस्तूल आणि १३ जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. याशिवाय, त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची स्फोटक पावडर, गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि सिम कार्ड नसलेला मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. अमिताभ यश यांनी सांगितले की, हा दहशतवादी २४ सप्टेंबर २०२४ रोजी पंजाबमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता.
यापूर्वी २३ फेब्रुवारी रोजी पंजाब पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन मुख्य कार्यकर्त्यांना अटक केली होती. हे दोघेही पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा आणि अमेरिकेतील गँगस्टर हॅपी पासियान यांच्याशी थेट संपर्कात होते. अटक केलेल्या आरोपींची ओळख जगदीश सिंग उर्फ जग्गा आणि शुभदीप सिंग औलख उर्फ शुभ अशी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पंजाबमध्ये टार्गेट किलिंग करण्याचे आदेश मिळाले होते.
हे ही वाचा:
ट्रम्प यांचा हमासला अंतिम इशारा; ओलिसांना सोडा नाहीतर तुमचा अंत निश्चित!
खलिस्तान्यांकडून जयशंकर यांच्या ताफ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न
‘अकबर’ बलात्कारी होता तर ‘औरंगजेब’ने असंख्य हिंदूंची हत्या केली!
सावरकर बदनामी प्रकरणी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या राहुल गांधींना दंड!
बब्बर खालसा इंटरनॅशनल हा एक दहशतवादी गट आहे, जो १९७८ मध्ये स्थापन झाला होता. गृह मंत्रालयाने या गटाला दहशतवादी संघटनांच्या यादीत ठेवले आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलमध्ये त्याला सर्वात संघटित आणि धोकादायक गटांमध्ये स्थान देण्यात आले आहे. हा गट सध्या कॅनडा, यूके, अमेरिका तसेच जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंड सारख्या अनेक युरोपीय देशांमध्ये कार्यरत आहे.