वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आउटवर्ल्ड मुंबई’ म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका बाजूला तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची चर्चा असतानाच, आता तिथे मोबाईल चोरीच्या घटनांनी आयोजकांच्या सुरक्षिततेच्या दाव्यांचे पितळ उघडे पाडले आहे. या कार्यक्रमात चोरांनी हातसफाई करत ११ जणांचे महागडे मोबाईल लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शनिवारी एनएससीआय डोम येथे आयोजित या कॉन्सर्टमध्ये हजारो तरुणांची गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आयफोन आणि सॅमसंग अल्ट्रासारख्या महागड्या (हाय-एंड) मोबाईलवर डल्ला मारला. एकाच वेळी अनेक चोरीच्या घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हे ही वाचा:
राजकोटमध्ये १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
३७० रुपयांची बिर्याणी भोवली, बॉसने तरुणाची हकालपट्टी केली!
मोदींनी केले काय? हा प्रश्न आज विचारायलाच हवा…
दक्षिण लेबनानमधील टायर शहरावर इस्रायलचा हवाई हल्ला
या कार्यक्रमात २८ वर्षीय ऋषील गांगुर्डे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता चोरीच्या घटनांमुळे आयोजकांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. ऋषीलच्या मृत्यूप्रकरणी पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.
ऋषीलच्या मृत्यूप्रकरणी आयोजक करण सिंग, पराग उके आणि ‘स्पेस बाउंड वेब लॅब्स’ या खासगी कंपनीच्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी (कलम ३०४-अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस ऋषीलच्या शवविच्छेदन अहवालाची (Post-mortem report) आणि हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.
एकाच कार्यक्रमात झालेली चोरी आणि तरुणाचा मृत्यू या दुर्दैवी घटनांमुळे एनएससीआय डोम येथील या कार्यक्रमाचे आयोजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
