पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राजारहाट-न्यूटाउन विधानसभा मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेसचे दोन वेळा आमदार राहिलेले आणि बिधाननगर महापालिकेचे माजी अध्यक्ष सब्यसाची दत्ता यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई झाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी उकळणे तसेच आपल्या परिसरातील लोकांना सातत्याने धमकावल्याचे आरोप आहेत.
माहितीनुसार, सध्या बिधाननगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक असलेल्या सब्यसाची दत्ता यांना कोलकात्याच्या उत्तरेकडील सॉल्ट लेक परिसरातील एका व्यावसायिकाने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर अटक करण्यात आली. हा परिसर बिधाननगर सिटी पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येतो. यापूर्वीही दत्ता यांच्याविरोधात भ्रष्टाचार, खंडणी आणि गुंडगिरीशी संबंधित अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर बिधाननगर उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी मध्यरात्रीनंतर राजारहाटमधील रायगाछी परिसरातील दत्ता यांच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. माहितीनुसार, घरी दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली.
सब्यसाची दत्ता हे २०११ ते २०२१ या कालावधीत उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राजारहाट-न्यूटाउन मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे सलग दोन वेळा आमदार होते. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२१ मध्ये त्यांनी बिधाननगर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसचे तीन वेळा आमदार आणि पश्चिम बंगालचे माजी अग्निशमन सेवा मंत्री सुजीत बोस यांनी त्यांचा पराभव केला होता.
हे ही वाचा:
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले
पिनराई विजयन यांच्या कन्या वीणा विजयन यांना ईडीचे समन्स
IPO पूर्वी झेप्टोवर ईडीची नजर; परदेशी गुंतवणुक प्रकरणी चौकशी
अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ओमान किनाऱ्याजवळून २४ भारतीय खलाशांची सुटका
विशेष म्हणजे, सुजीत बोस हे देखील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राज्यातील नगरपालिका भरती घोटाळ्यात ‘नोकरीच्या बदल्यात पैसे’ घेतल्याच्या आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या महिन्यात त्यांना अटक केली होती. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता यांनी याच जिल्ह्यातील बारासात विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
