तामिळनाडू पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातून अबुबकर सिद्दीकी आणि मोहम्मद अली या दहशतवाद्यांना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, हे दहशतवादी तब्बल ३० वर्षांपासून फरार होते. अखेर पोलिसानी कारवाई करत दहशतवाद्यांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई आणि तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोनही दहशतवादी गेल्या ३० वर्षांपासून फरार होते. त्यांच्यावर तामिळनाडूमध्ये अनेक मोठ्या बॉम्बस्फोटांचा आरोप आहे. त्यापैकी अबुबकर सिद्दीकीवर ५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. अटकेनंतर, दोन्ही दहशतवाद्यांना चेन्नईच्या क्यू ब्रांच (एटीएस) कडे सोपवण्यात आले आहे, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे.
१९९५ पासून दहशतवादी सिद्दीकी फरार
बॉम्ब बनवणारा आणि कट्टरपंथी विचारवंत असलेला सिद्दीकी १९९५ पासून फरार होता आणि त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तमिळनाडू आणि शेजारच्या राज्यांमध्ये झालेल्या अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी घटनांमध्ये तो सूत्रधार असल्याचे मानले जाते. बिलाल मलिक, फकरुद्दीन आणि पन्ना इस्माइल यांच्यासह अनेक प्रमुख कट्टरपंथी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात त्याने मध्यवर्ती भूमिका बजावली.
१९९५ मध्ये चेन्नईतील चिंताद्रिपेट येथील हिंदू मुन्नानी कार्यालयात झालेला बॉम्बस्फोट आणि त्याच वर्षी नागोरमध्ये झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटात थंगम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, यासह अनेक प्राणघातक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता, त्यामुळे दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये सिद्दीकीची अटक ही एक महत्त्वाची घटना असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा :
हिमाचल प्रदेशमध्ये बघा ढगफुटीने काय घडलं ?
सावधान ! मे महिन्यात मलेरियाचे ५ लाखांहून अधिक रुग्ण
कोविड लस आणि अचानक मृत्यू यामध्ये कोणताही संबंध नाही
टीएमसी नेत्यांचं मेंदू नीट काम करत नाही…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही दहशतवादी अनेक प्रकरणांमध्ये हवे होते. यामध्ये १९९५ मध्ये हिंदू मुन्नामीच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, नागोरमधील हिंदू कार्यकर्ते टी. मुथुकृष्णन यांच्या निवासस्थानी पार्सल बॉम्ब हल्ला, २०११ मध्ये मदुराई येथे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या मार्गावर पाईप बॉम्ब पेरणे, २०१३ मध्ये बंगळुरू भाजप कार्यालयात स्फोट आणि चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालय आणि कोइम्बतूर पोलिस क्वार्टरमध्ये स्फोट यांचा समावेश आहे.
