लहान मुलांना हाताशी धरून परदेशी पर्यटकांना लुटणारी महिला अटकेत

जर्मन पर्यटकाला केले होते लक्ष्य

लहान मुलांना हाताशी धरून परदेशी पर्यटकांना लुटणारी महिला अटकेत

परदेशी पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्या सामानाची चोरी करणाऱ्या एका महिलेला खार पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःकडील वस्तू विकण्याचा बहाणा करून या महिलेने एका जर्मन पर्यटकाच्या बॅगेतून सुमारे २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.

या प्रकरणी खार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिला काजल अजय खारवा (२०) हिला अंधेरी येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली. काजलसोबत तिची लहान मुलेही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

जर्मन पर्यटक गुट हॅन्स (२८) हे मुंबईतील खार परिसरात एका हॉटेलमध्ये थांबले होते. गुरुवारी रात्री ते एका रेस्टॉरंटजवळ उभे असताना काजल तिच्या दोन लहान मुलांसह त्यांच्याजवळ आली. तिने हॅन्स यांना तिच्याकडील कटलरी वस्तू खरेदी करण्यासाठी आग्रह धरला. हॅन्स यांनी नकार दिल्यानंतरही ती त्यांच्यामागे लागली.

हे ही वाचा:

राहुल गांधींचा आणखी एक दावा निघाला खोटा!

नक्षलवाद्यांचा कट उधळला

भारतीय क्रिकेटची भिंत चेतेश्वर पुजारा निवृत्त

जम्मू-कश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार

याच वेळी काजलसोबत असलेल्या ५ ते ६ वर्षांच्या मुलांनी हॅन्स यांच्याशी लगट करून त्यांना गोंधळात पाडले. या गोंधळाचा फायदा घेऊन काजलने हॅन्स यांच्या खांद्यावरच्या बॅगेची चेन उघडून त्यातील २०० युरो आणि भारतीय चलनाच्या नोटा चोरल्या.

काही वेळाने हॅन्स यांनी आपली बॅग तपासली असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत काजलचा माग काढला आणि शुक्रवारी तिला अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल लहान मुलांचा वापर करून श्रीमंत व्यक्तींनाही लक्ष्य करत असे. सध्या काजल न्यायालयीन कोठडीत असून, तिच्या टोळीत आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version