व्लादिमिर पुतिन हे तब्बल ८८ टक्के मते मिळवून रशियाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी ठरले आहेत. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या अधिकृत निकालात हा तपशील उघड झाला आहे. पुतिन यांना तब्बल ८७.९७ टक्के मते मिळाली. विरोधी पक्षांना कठोरपणे नेस्तनाबूत केले जात असल्याचा आणि भाषण स्वातंत्र्याचा मुद्दा रशियात उपस्थित होत असताना हे मतदान झाले.
एकूण तीन उमेदवारांना पुतिन यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी परवानगी मिळाली होती. महत्त्वाचे म्हणजे यापैकी एकाही उमेदवाराने युक्रेन युद्धाला विरोध केला नव्हता. पसंतीचे उमेदवार स्पर्धेत नसल्याने रशियन नागरिकांनी रविवारी निवडणूक केंद्राबाहेर पुतिन यांच्या विरोधात जोरदार निदर्शनेही केली. या निवडणुका शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत सुरू होत्या. याच दरम्यान रशियामध्ये युक्रेनच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्लेही केल्याचे समजते.
रशियाचे विरोधी पक्षनेते आणि पुतिन यांचे टीकाकार अलेक्झी नॅवल्नी यांचा गेल्याच महिन्यात तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता. पुतिनचे अन्य टीकाकारही एकतर तुरुंगात किंवा विजनवासात आहेत. त्यामुळे मतदारांसमोर दुसरा उमेदवारच नव्हता.जे पुतिन यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत किंवा युद्धाच्या विरोधात आहेत, त्यांनी आगामी निवडणुकीत हा विरोध दाखवून द्यावा, असे आवाहन नॅवल्नी यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. त्यामुळे रशिया आणि आणि जगभरातील रशियाच्या दूतावासासमोरील निवडणूक केंद्रांबाहेर रशियन नागरिकांनी गर्दी केली होती. अलेक्झी नॅवल्नी यांची पत्नी युलिया नॅव्हाल्नाया हिने बर्लिन येथील रशियन दूतावासात मतदान केले. पाच तासांपेक्षा जास्त वेळ रांगेत उभे राहून तिने मतदान केले. मत दिल्यानंतर तिच्या दिवंगत पतीचे नाव मतपत्रिकेवर लिहिल्याचे तिने सांगितले.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना गुडबाय; आमदार आमशा पाडवी एकनाथ शिंदेकडे!
यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!
हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!
आयपीएल २०२४चा संपूर्ण हंगाम भारतातच!
रशियातील विविध मतदान केंद्रे आणि ऑनलाइन पद्धतीनेही हे मतदान तीन दिवस पार पडले. रशियात रविवारी रात्री मतदान बंद झाले असले तरी जगभरातील रशियाच्या दूतावासात मतदान सुरू होते. पोलिस बंदोबस्त असूनही अनेक ठिकाणी नासधूस करण्याच्या घटना घडल्या. मतदान केंद्रे पेटवून देण्याचा आणि स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मॉस्को आणि सेंट पीटरबर्ग शहरांतून अनेकांना अटक करण्यात आली. तर, मतपेट्यांवर शाई टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले. रशियातील २० शहरांतून सुमारे ८० जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.