अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे AH-64 अपा (AH-64 Apache) चे अटॅक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील दोन्ही चालक दल सदस्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र, हे हेलिकॉप्टर इराणच्या हल्ल्यामुळे कोसळले की तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला अथवा यामागे अन्य काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्य या परिसरात लष्करी मोहिमा राबवत असताना ही घटना घडली. अमेरिकन प्रशासन आणि अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) यांनी अद्याप या संदर्भात कोणतेही सविस्तर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी सुरू असून सर्व संभाव्य कारणांचा तपास केला जात आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक मानला जातो. जागतिक तेलपुरवठ्याचा मोठा हिस्सा या मार्गातून वाहतूक केला जातो. गेल्या काही महिन्यांत अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावामुळे हा परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. वृत्तांनुसार, इराणने उभारलेल्या कथित अडथळ्यांना निष्प्रभ करण्यासाठी CENTCOM अपाचे हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने आणि ड्रोनचा वापर करत आहे. या धोरणाचा भाग म्हणून अमेरिकेच्या लष्करी हालचाली या भागात सातत्याने वाढल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते, फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याचा संघर्ष सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची ही पहिली घटना आहे. याच कालावधीत इराणने अमेरिकेचे ३० MQ-9 रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. सामान्यतः अपाचे हेलिकॉप्टरांचा वापर टेहळणी, गस्त आणि जमिनीवरील कारवायांना सहाय्य करण्यासाठी केला जातो. परंतु अलीकडील घडामोडींमुळे अमेरिकन लष्कराने अधिक आक्रमक धोरणाचा अवलंब करत संवेदनशील भागांमध्ये या हेलिकॉप्टरांची तैनाती वाढवली आहे. CENTCOM ने आपली लष्करी उपस्थिती अधिक प्रभावी करण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टरांच्या मोहिमांचा विस्तार पूर्वीपेक्षा अधिक व्यापक स्वरूपात केला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पिनराई विजयन यांच्या कन्या वीणा विजयन यांना ईडीचे समन्स
IPO पूर्वी झेप्टोवर ईडीची नजर; परदेशी गुंतवणुक प्रकरणी चौकशी
अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ओमान किनाऱ्याजवळून २४ भारतीय खलाशांची सुटका
मोदींनी नेहरूंना टाकले मागे; सर्वाधिक काळ पंतप्रधान
सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी अपघाताच्या कारणांबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हेलिकॉप्टर एखाद्या हल्ल्याचे लक्ष्य ठरले होते की तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, हे स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील वाढती अस्थिरता आणि अमेरिका-इराणमधील सुरू असलेल्या लष्करी तणावाबाबतच्या चिंता पुन्हा एकदा वाढल्या आहेत. आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष चौकशीच्या निष्कर्षांकडे आणि दोन्ही देशांच्या पुढील धोरणात्मक भूमिकेकडे लागले आहे.
