भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना पाकिस्तानसह दहशतवाद्यांना कडक शब्दांत इशारा दिला आणि यापुढे दहशतवादी कृत्याला अजिबात खपवून घेतले जाणार नाही, भारताविरोधात असे दुःसाहस केले तर ते चिरडून टाकले जाईल, असा दम मोदींनी आपल्या या संबोधनातून भरला.
अर्धा तास झालेल्या या संबोधनात मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत देशाचे सामर्थ्य आणि संयम हे लोकांनी पाहिला. मी प्रथम भारताच्या पराक्रमी सेनादलांना, सशस्त्र दलांना, गुप्तचर यंत्रणांना, शास्त्रज्ञांना भारतीयांच्या वतीने सलाम करतो. वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी असीम शौर्य दाखवले. मी त्यांची वीरता, साहस, पराक्रम आज आपल्या देशातील प्रत्येक मातेला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मुलीला हा समर्पित करतो.
मोदींनी सांगितले की, २२ एप्रिलला पहलगामला दहशतवाद्यांनी जी निर्घृण हत्या केली, त्यातून देशाला, जगाला धक्का बसला. सुट्ट्या घालविण्यासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांना धर्म विचारून परिवारासमोर, मुलांसमोर निर्दयपणे मारणे हा दहशतवादाचा बीभत्स चेहरा होता, क्रूरता होती. देशाच्या सद्भावाला तोडण्याचा हा प्रयत्न होता. माझ्यासाठी ही वैयक्तिकरित्या खूप मोठी वेदना होती. या हल्ल्यानंतर सारे राष्ट्र, प्रत्येक नागरीक समाज, राजकीय पक्ष एकाच स्वरात दहशतवादाच्या विरोधात कारवाईसाठी उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारताच्या सेनेला पूर्ण मोकळीक दिली. आज प्रत्येक दहशतवादी प्रत्येक संघटना समजून चुकले आहे. बहिणी, मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो हे कळले असेल. ऑपरेशन सिंदूर हे नाव नाही तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मेच्या रात्री ७ मेच्या पहाटे सगळ्या जगाने या प्रतिज्ञेला प्रत्यक्षात येताना पाहिले. भारताच्या सेनेने पाकिस्तानातील दहशतवादांच्या तळांवर, प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल तर भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो. पण देश एकजूट असतो नेशन फर्स्टच्या भावनेने भारलेला असतो, राष्ट्र सर्वोपरी असते तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात.
मोदी म्हणाले की, पाकिस्तानात दहशतवादांच्या अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, ड्रोन्सनी हल्ला केला तेव्हा दहशतवादांची वीट न वीट उद्ध्वस्त झाली.
बहावलपूर, मुरिदके ही ठिकाणे जागतिक दहशतवादाची केंद्र राहिलेली आहेत. जगात मोठे दहशतवादी हल्ले झाले ९-११, लंडन ट्युब बॉम्बिंग, भारतात अनेक हल्ले झाले या सगळ्यांचे कनेक्शन या ठिकाणांशी आहेत. दहशतवाद्यांनी महिलांचे कुंकू पुसले म्हणून भारताने दहशतवादाचे हे केंद्र उजाड केले. भारताच्या या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले गेले.
हे ही वाचा:
सेनादलांचे स्पष्ट संकेत, दु:साहस केलेत तर तांडव होणार…
काँग्रेसला ‘देशद्रोह्यांची पार्टी’ कोणी म्हटले ?
कोहलीच्या टेस्ट संन्यासावर क्रिकेटविश्व भावूक
अमेरिका, चीनमधील टॅरिफ वॉर ९० दिवसांसाठी स्थगित
मोदींनी सांगितले की, दहशतवादाचे आका या अडीच-तीन दशकांपासून पाकिस्तानात फिरत होते. भारताविरोधात कारस्थाने रचत होते. भारताने एका फटक्यात त्यांना भुईसपाट केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान निराशेत खितपत पडला आहे. यातूनच त्यांनी दुःसाहस केले. दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा देण्यापेक्षा भारतावरच हल्ला केला. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारे, मंदिर सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने सैन्य ठिकाणांना लक्ष्य केले. पण पाकिस्तानचा बुरखा फाटला. जगाने पाहिले की, कशापद्धतीने पाकिस्तानचे ड्रोन्स, क्षएपणास्त्रे भारतासमोर कोसळली. एअर डिफेन्स सिस्टिममने आकाशात त्यांना नष्ट केले. पाकिस्तानची तयारी भारताच्या छातीवर वार करण्याची होती पण भारताने पाकिस्तानच्याच छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स, क्षएपणास्त्र यांनी अचूक हल्ले केले. पाकिस्तानी वायूसेनेच्या एअर बेसला नुकसान पोहोचवले, ज्यावर पाकिस्तानला अभिमान होता. ३ दिवसात पाकिस्तानला उद्ध्वस्त केले त्याचा त्यांना अंदाजही नव्हता. मोदी म्हणाले की, आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान धावपळ करू लागला. जगभरात तणाव कमी करण्यासाठी याचना करू लागला. झोडपून काढल्यामुळे लाचार होऊन १० मेच्या दुपारी पाकिस्तानी सेनेने भारताच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आम्ही दहशतवादाच्या या केंद्रांना उद्ध्वस्त केले होते. अतिरेक्यांना मारण्यात आले होते. पाकिस्तानच्या छाताडातले हे अड्डे नष्ट केले. म्हणून पाकिस्तानकडून याचना केली गेली. त्यांच्याकडून पुढील दहशतवादी कारवाई आणि त्यांचे सैन्य दुःसाहस दाखवणार नाही, हे आश्वासन मिळाले तेव्हा भारताने त्यावर विचार केला.
