भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका रंगणार आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याचा संघात समावेश झालेला नाही, पण उर्वरित तीन सामन्यांत तो मैदानावर परतण्याची शक्यता आहे.
पहिला टी२० सामना २९ ऑक्टोबरला कॅनबेरामध्ये खेळला जाणार आहे. मॅक्सवेलने सांगितले की, मनगटाची सर्जरी झाल्यानंतर तो जलदगतीने रिकव्हर होत असून भारताविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांत खेळण्याचं त्याचं लक्ष्य आहे.
मेलबर्नमध्ये पत्रकारांशी बोलताना मॅक्सवेल म्हणाला,
“माझ्याकडे दोन पर्याय होते — संपूर्ण मालिका सोडून द्यावी किंवा सर्जरी करून परत येण्याची शक्यता ठेवावी. मी सर्जरीचा निर्णय घेतला, जेणेकरून बिग बॅश लीगपूर्वी पूर्णपणे फिट होऊ शकेन.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीनही सामने आणि टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही स्वरूपांमध्ये मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान कॅनबेरा, मेलबर्न, हॉबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे खेळली जाणार आहे.
मॅक्सवेलने आजवर १२४ टी२० सामन्यांच्या ११४ डावांत २,८३३ धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर १४५ धावा आहे. त्याच्या बॅटमधून आजवर २४० चौकार आणि १४८ षटकार झळकले असून त्याच्या नावावर १२ अर्धशतकं आणि ५ शतकं आहेत. गोलंदाजीत त्याने ४९ बळी घेतले असून सर्वोत्तम कामगिरी १० धावांत ३ बळी अशी आहे.







