आयपीएल २०२६ मधील ६७व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर तब्बल ५५ धावांनी शानदार विजय मिळवला. मात्र या पराभवानंतरही आरसीबीसाठी आनंदाची बातमी मिळाली. कारण गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत बंगळुरूने थेट पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने २० षटकांत ४ बाद २५५ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. गुणतालिकेत टॉप-२ मध्ये राहण्यासाठी हैदराबादला हा सामना ९० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी जिंकणं आवश्यक होतं. मात्र आरसीबीने मोठा पराभव टाळत हैदराबादचं गणित बिघडवलं.
२५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने २० षटकांत ४ बाद २०० धावा केल्या. त्यामुळे पराभव झाला असला तरी नेट रनरेटच्या जोरावर आरसीबीने पहिल्या स्थानावर कब्जा कायम ठेवला. आता २६ मे रोजी पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादनेही लीग स्टेज १८ गुणांसह पूर्ण केला. मात्र नेट रनरेटमध्ये आरसीबी आणि गुजरातपेक्षा मागे राहिल्याने संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आता २७ मे रोजी हैदराबाद एलिमिनेटर सामना खेळणार असून त्यांचा प्रतिस्पर्धी अद्याप निश्चित झालेला नाही.
एसआरएचकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने दमदार सुरुवात केली. दोघांनी मिळून अवघ्या ३.६ षटकांत ४५ धावांची भागीदारी केली. हेडने १६ चेंडूत २६ धावा केल्या, तर अभिषेक शर्माने २२ चेंडूत ५६ धावांची स्फोटक खेळी करत आरसीबीच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपलं.
ईशान किशन पुन्हा एकदा जबरदस्त लयीत दिसला. त्याने ४६ चेंडूत ७९ धावांची तडाखेबाज खेळी केली. हेनरिक क्लासेनने २४ चेंडूत ५१ धावा फटकावत मोठा हातभार लावला. शेवटच्या षटकांत नीतीश कुमार रेड्डीने १२ चेंडूत नाबाद २९ धावा करत संघाचा स्कोअर २५५ पर्यंत पोहोचवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून वेंकटेश अय्यरने १९ चेंडूत ४४ धावांची धडाकेबाज खेळी केली. विराट कोहलीसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. मात्र विराट १५ धावांवर बाद झाला. देवदत्त पडिक्कलने २१ धावांचं योगदान दिलं.
कर्णधार रजत पाटीदारने ३९ चेंडूत ५६ धावांची झुंजार खेळी केली, तर क्रुणाल पांड्याने ३१ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. टीम डेविडने ७ चेंडूत १५ धावा फटकावल्या, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही.
