नवी दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर ७६ येथे १३ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या अंकित चौहान यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपी शशांक जादौन आणि मनोज कुमार यांना अनुक्रमे जन्मठेपेसह ७० हजार रुपये आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने याआधी २० सप्टेंबर रोजी दोघांनाही दोषी ठरवले होते.
इलाहाबाद उच्च न्यायालयाने या हत्येच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली होती, आणि सीबीआयने १४ जून २०१६ रोजी प्रकरणाची नोंद केली. सीबीआयच्या माहितीनुसार, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता अंकित चौहान यांची त्यांच्याच फॉर्च्युनर कारमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तपासानंतर सीबीआयने गुन्ह्याचा उलगडा केला आणि आरोपी शशांक जादौन व मनोज कुमार यांना २०१७ मध्ये अटक केली.
हेही वाचा..
भारत-पाक सीमेजवळून तीन शस्त्रं जप्त
बिहारच्या जनतेने आता राजदचे हे बघण्याची वेळ आलीय
पॅलेस्टाईनच्या मान्यतेसाठी इस्रायली संसदेत ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी
देवाभाऊ देवासारखे धावले; दुबईत नोकरीसाठी गेलेल्या मुलाचे अंतिम दर्शन आईवडिलांना घडले
सीबीआयने २९ ऑगस्ट २०१७ रोजी गाझियाबाद येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडे हत्या, दरोड्याचा प्रयत्न, आपराधिक कट आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करून दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सुप्रीम कोर्टाने २ ऑगस्ट २०१९ रोजी या प्रकरणाची सुनावणी गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथून नवी दिल्लीला हलवण्याचा आदेश दिला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.
याशिवाय, सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने IRCTC हॉटेल घोटाळा प्रकरणात १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी प्रसाद यादव, राज्यसभा खासदार प्रेमचंद गुप्ता, त्यांची पत्नी सरला गुप्ता, IRCTC अधिकारी, कोचर बंधू आणि इतर मिळून एकूण १४ जणांविरुद्ध आरोप ठरवले गेले आहेत. सीबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे प्रकरण ५ जुलै २०१७ रोजी नोंदवले गेले. तपास यंत्रणेच्या मते, रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी सुझाता हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड (SHPL) चे मालक विजय कोचर आणि विनय कोचर तसेच इतरांसोबत संगनमत करून IRCTCच्या रांची आणि पुरी येथील बीएनआर (बंगाल नागपूर रेल्वे) हॉटेलांच्या लीजिंग प्रक्रियेत गैरव्यवहार केले होते.
