पाँडिचेरी विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवात हिंदू देवता देवी सीता आणि भगवान हनुमान यांच्या अपमानास्पद चित्रणाचा समावेश असलेल्या एका नाटकामुळे वादंग निर्माण झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या नाटकाचा निषेध केला होता. आता या प्रकरणी विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या प्रमुखांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले आहे. २९ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. दरम्यान विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचा निकाल येईपर्यंत विभागाच्या प्रमुखांना त्यांच्या भूमिकेपासून दूर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी (२९ मार्च) रोजी पाँडिचेरी विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाने वार्षिक सांस्कृतिक महोत्सव एझिनी २ के२४ मध्ये हे वादग्रस्त नाटक सादर केले होते. या नाटकाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला आणि या नाटकाविरोधात विद्यापीठात तसेच स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. स्टेशन कलापेठ पोलिसांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ परिसरात निदर्शने करत निवेदनही दिले.
हेही वाचा..
मयांक यादवच्या वेगवान गोलंदाजीने बेंगळुरूच्या प्रेक्षकांमध्ये सन्नाटा!
दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!
एक काळ असा होता जेव्हा नेहरू म्हणाले होते ‘भारत दुसरा, चीन पहिला’
अनिल परबांच्या दापोलीमधील साई रिसोर्टवर हातोडा!
या घटनेची दखल घेत विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली. विद्यापीठाचे सहाय्यक निबंधक डी. नंदगोपाल यांनी विद्यार्थी तक्रारकर्त्यांना सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ती तीन ते चार दिवसांत अहवाल देईल.समितीचा अहवाल प्रलंबित असताना विभागप्रमुखांना ताबडतोब राजीनामा देण्यास सांगितले आहे. आम्ही परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांकडून स्पष्टीकरण मागवले आहे.विद्यापीठ कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आपल्या कॅम्पसमध्ये धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, या वादग्रस्त नाटकात सहभागी विद्यार्थ्यांनी धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू किंवा प्रयत्न नाकारले आहेत. परफॉर्मिंग आर्ट्स विभागातील काही विद्यार्थ्यांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी ‘सोमयनाम’ नावाचे हे नाटक सादर करणाऱ्या टीमशी एकजुटीने एक निवेदनही जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, या नाटकाचा हेतू कोणत्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा नाही. वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले, आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धांचा समान आदर करतो. जर आम्ही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.