सहकार चळवळीला बदनाम करायचे, निस्तेज करायचे आणि नंतर सर्व काही हडप करायची वृत्ती फोफावली होती. सहकारातील बेशिस्त आणि एकाधिकारशाहीला देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी लगाम घालून भाकरी फिरवण्याचे महत्वाचे काम केले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यूपीए सरकारच्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती, मात्र २०१४ पासून तब्बल दहा लाख कोटी रुपयांची मदत केंद्राने राज्याला केली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते आज (५ ऑक्टोबर) रोजी लोणी अहिल्यानगार येथे पार पडले. त्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
कोणत्याही क्षेत्रात बदल झाले नाही तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही. शहा यांच्या नेतृत्वात आजच्या सहकारात नवनवीन बदल होत आहेत, सहकार क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल होत आहे. गृहमंत्री असून देखील त्यांना शेती शेतकरी यांच्या बद्दल प्रचंड आस्था आहे. सतत नव्याच्या शोधात असताना जुन्या परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान नवसंशोधन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला आहे. म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असून त्याचे शिल्पकार अमित शाह आहेत असेही शिंदे म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले तेव्हा शहा यांनी दहा हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स माफ केला होता, याची आठवण शिंदे यांनी करून दिली. शाह यांनी सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणली, इथेनॉल उत्पादनाला चालना दिली. या सर्वाचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला पाहिजे असेही त्यांचे धोरण आहे. ग्रामीण सहकारी बँकांना नवसंजीवनी देण्याचे काम ही शाह यांनी केले.
राज्यावर यंदा पूर परिस्थितीचे फार मोठे संकट कोसळले आहे. येथे शेतकऱ्यांची जमीन शेती आणि संसार उध्वस्त झाले आहेत. सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपल्याकडून राज्याला भरीव आर्थिक मदतीची गरज आहे. राज्यावर जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा केंद्र सरकार पाठीशी राहिले आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की केंद्र सरकार आम्हाला दिलासा देईल.
१०-११ वर्षांपूर्वी सत्तेत असणाऱ्या सरकारने विविध माध्यमातून दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत दहा लाख कोटींची आर्थिक मदत केली आहे. अमित शहा यांनी सहकारातील तत्त्व जिवंत ठेवले आहे. सहकार म्हणजे सामाजिक जबाबदारी आहे याचे भान, जाणीव शाह यांना आहे. सहकार अधिक लोकाभिमुख केले तर त्याचा फायदा सर्वांना होईल, याचसाठी अमित शहा यांनी सहकारातील मक्तेदारी मोडीत काढली आहे.
लोकशाही, चारित्र्य बंधुभाव प्रगती हा सहकाराचा आत्मा आहे आणि हा आत्मा महाराष्ट्राने जपला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी देखील सहकाराचे महत्व ओळखले आहे आणि यासाठी त्यांनी केंद्रामध्ये सहकार मंत्रालय सुरू करून त्याची जबाबदारी अमित शाह यांना दिली. त्यामुळे आता सहकारातील मक्तेदारी मोडीत निघाली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मोदी यांनी ३७० कलम हटवण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले. त्याच आत्मियतेने शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी शाह हे प्रयत्न करीत आहेत. देशातील अंतरिक सुरक्षा मजबूत करताना त्यांनी नक्षलवादाचा खात्मा केला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
पूरस्थितीच्या नुकसानीचा अहवाल पाठवा, मोदी विनाविलंब मदत देणार!
भूतानने भारतीय सैन्याचे मानले आभार, पूरपरिस्थितीत तत्काळ मदत!
महिला वर्ल्डकप क्रिकेट सामन्यातही भारत-पाक कर्णधारांनी हस्तांदोलन नाही
बिहार निवडणुकीत १७ नवीन नियम, प्रत्येक मतदान केंद्रावर १२०० पेक्षा अधिक मतदार नसतील!
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखाना उभारताना सामाजिक, माणुसकी आणि सहकाराच्या जाणीव डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक केली होती. आजही गुंतवणूक दोन पिढ्यानंतर खोपलेली पाहत आहोत. त्यांनी उभारलेल्या सहकाराचा आज वटवृक्ष झाला आहे. याच कारणांनी प्रवरा-लोणी हे ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरले आहे, असे गौरव उद्गार शिंदे यांनी काढले.
विखे पाटील परिवाराने सहकाराला शेती पुरते मर्यादा ठेवले नाही, त्यांनी प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरा को-ऑपरेटिव बँक, शैक्षणिक संस्था, कृषी व आरोग्य प्रकल्प या माध्यमातून संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्याला नवसंजीवनी दिली आहे. शिक्षण आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभरामध्ये अहिल्या नगर जिल्ह्याची ओळख झाली आहे. मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी सुद्धा हा वारसा जपला आहे तसेच सुजय विखे पाटील तो समर्थपणे पुढे नेत आहेत, सर्वांना अभिमान असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.







