भारतीय उद्योग परिसंघ (CII) आणि केपीएमजी इंडिया यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालानुसार, भारताचं संरक्षण उत्पादन २०२४-२५ मध्ये असलेल्या अंदाजे १.४६ लाख कोटी रुपयांवरून २०४७ मध्ये सहापट वाढून तब्बल ८.८ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताने आपला वार्षिक संरक्षण बजेट ६.८१ लाख कोटी रुपये इतका निश्चित केला आहे. हा खर्च २०४७ पर्यंत ५ पट वाढून ३१.७ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त केला गेला आहे.
सीआयआयच्या ‘Annual Business Summit 2025’ मध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालाचं शीर्षक आहे —
‘आत्मनिर्भर, अग्रणी आणि अतुल्य भारत २०४७: इंडियाज डिफेन्स इंडस्ट्रियल सेक्टर व्हिजन २०४७’
🔹 संरक्षण निर्यातीत १२ पट वाढ
अहवालानुसार, भारताची संरक्षण निर्यात सुद्धा २०२४-२५ मध्ये असलेल्या २४,००० कोटी रुपयांवरून २०४७ मध्ये २.८ लाख कोटी रुपये इतकी होईल, म्हणजेच सुमारे १२ पट वाढ.
🔹 GDP च्या ४.५% पर्यंत संरक्षण खर्च
सध्या भारताचं संरक्षण बजेट GDP च्या सुमारे २% आहे. हा खर्च २०४७ पर्यंत GDP च्या ४.५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी सध्याचं ४% बजेट ८-१०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
🔹 मोठ्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीची गरज
अहवालात म्हटलं आहे की, भारताने २०४७ पर्यंत एक विकसित देश म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मजबूत संरक्षण क्षेत्र आवश्यक आहे. त्यासाठी खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणं, तसेच पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप वाढवणं आवश्यक आहे.
🔹 जागतिक संरक्षण बाजारात भारताचं स्थान
२०३८ पर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवावी, जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादनांचा निर्यातीत मोठा वाटा घ्यावा आणि २०४५ पर्यंत कटिंग-एज टेक्नोलॉजीत ग्लोबल लीडर होण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असंही या अहवालात नमूद केलं आहे.
