आपल्या वीरपुत्राचा कीर्तीचक्र पुरस्कार स्वीकारताना आईचा हंबरडा

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

आपल्या वीरपुत्राचा कीर्तीचक्र पुरस्कार स्वीकारताना आईचा हंबरडा

महाराष्ट्राचे वीर सुपुत्र प्रवीण जंजाळ यांच्या मातोश्री शालू जंजाळ आणि त्यांची पत्नी श्यामबाला या राष्ट्रपती भवनात कीर्तीचक्र स्वीकारण्यासाठी आल्या. प्रवीण जंजाळ यांनी गाजविलेल्या शौर्याचा तिथे उल्लेख करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यादेखील आपल्या खुर्चीवरून उतरून पुढे आल्या. प्रवीण जंजाळ यांच्या वीरतेची कहाणी सांगितली जात असताना त्यांच्या आई शालू यांना अश्रु आवरत नव्हते. त्या आपल्या मुलाला मिळालेला मरणोत्तर पुरस्कार घेताना ओक्साबोक्शी रडत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या समीप पोहोचल्यावर त्यांनी हंबरडा फोडला. राष्ट्रपतींनीही त्यांना जवळ घेत त्यांचे सांत्वन केले. हा एकूण प्रसंग मन हेलावून टाकणारा होता.

सोमवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या सोहळ्यात मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले. गेल्यावर्षी जुलै महिन्यात जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. प्रवीण जंजाळ हे महार रेजिमेंटच्या पहिली बटालियन राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. काल दिल्लीत प्रवीण जंजाळ यांना जेव्हा मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले तेव्हा त्यांची आई शालू जंजाळ आणि पत्नी श्यामबाला जंजाळ उपस्थित होत्या. या दोघींनी प्रवीण जंजाळ यांचे मरणोत्तर कीर्ति चक्र स्वीकारले. यावेळी भावूक वातावरण पाहायला मिळाले.

हे ही वाचा:

इस्रायलमध्ये उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

घसरणीनंतर बाजाराचा दमदार पलटवार!

इराणला मदत करणाऱ्या दोन भारतीय मुस्लिमांना सौदीत केले जेरबंद

पिनराई विजयन यांच्या कन्या वीणा विजयन यांना ईडीचे समन्स

मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यासाठी प्रवीण जंजाळ यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्यांची पत्नी आणि आई राष्ट्रपतींच्या व्यासपीठासमोर आल्या. यावेळी प्रवीण जंजाळ यांनी कशाप्रकारच्या निडरतेने दहशतवाद्यांना नामोहरम केले, याबद्दल सांगण्यात आले. आपल्या मुलाच्या पराक्रमाची कहाणी ऐकताना शालू जंजाळ यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ६ जुलै २०२४  रोजी देशासाठी लढताना शहीद झाले होते. ते अवघ्या २४  वर्षांचे होते.

६ जुलैला भारतीय लष्करातर्फे कुलगाम येथे एक सर्च ऑपरेशन सुरु होते. प्रवीण जंजाळ या लष्करी मोहीमेत सहभागी होते. त्यांनी दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली टिपताच इतर सैनिकांना सतर्क केले. त्यावेळी दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. मात्र, प्रवीण जंजाळ यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तर देत उलटा गोळीबार केला. यामुळे दहशतवाद्यांना तिथून निसटता आले नाही. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरु असतानाही प्रवीण जंजाळ यांनी न डगमगता दोन दहशतवाद्यांना अचूक गोळ्या झाडून ठार मारले. मात्र, या सगळ्यात दहशतवाद्यांची एक गोळी त्यांच्या डोक्यात शिरली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. तरीही प्रवीण जंजाळ शेवटपर्यंत लढत राहिले आणि लढता-लढताच त्यांनी जीव सोडला. या सर्वोच्च बलिदानासाठी शिपाई प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आले.

Exit mobile version