भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी शनिवारी व्यावसायिक टेनिसमधून संन्यासाची घोषणा केली. यासह त्यांच्या तब्बल वीस वर्षांहून अधिक काळाच्या करिअरचा शेवट झाला आहे.
बोपण्णाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले –
“अलविदा… पण हा शेवट नाही. त्या खेळाला निरोप कसा देऊ, ज्याने माझ्या आयुष्याला अर्थ दिला? २० अविस्मरणीय वर्षांनंतर आता वेळ आली आहे – मी अधिकृतरीत्या संन्यास घेतो आहे.”
त्यांनी पुढे लिहिले,
“आज हे लिहिताना मन भारी आहे, पण कृतज्ञही आहे. माझी सुरुवात भारतातील कूर्ग या छोट्याशा गावातून झाली. सर्व्ह मजबूत करण्यासाठी लाकडाची ओंडके फोडली, स्टॅमिना वाढवण्यासाठी कॉफीच्या मळ्यात धावलो. आणि आज जगातील सर्वात मोठ्या कोर्टांवर उभं राहणं – हे स्वप्नासारखं आहे.”
“टेनिस हा फक्त खेळ नव्हता; त्याने मला दिशा दिली जेव्हा मी हरवलेलो होतो, बळ दिलं जेव्हा मी तुटलो होतो, आणि विश्वास दिला जेव्हा जगाने शंका घेतली. कोर्टावर उतरताना त्याने संयम, लढण्याची ताकद आणि पुन्हा उठण्याची शिकवण दिली.”
बोपण्णाने यूएस ओपनसह चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत मजल मारली होती. त्यांनी २०१२ आणि २०१५ मध्ये महेश भूपती व फ्लोरिन मर्जिया यांच्यासोबत एटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत खेळले.
२०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकणारे बोपण्णा भारतासाठी डेव्हिस कप आणि ऑलिंपिकमध्येही खेळले. ४३ वर्षांच्या वयात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारे ते जगातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरले.
बोपण्णाने अखेरचा सामना पॅरिस मास्टर्स १००० मध्ये अलेक्झांडर बुब्लिक याच्यासह खेळला होता.







