जिथे अजून पूर्ण शहर उभंसुद्धा राहिलेलं नाहीये…, जिथे अजून लाखोंची लोकवस्ती नाहीये, जिथे अजून गगनचुंबी इमारतींची रांग दिसत नाहीये; तिथे जर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होत असेल; जगातील मोठमोठ्या कंपन्या आपले प्रकल्प उभारण्यासाठी रांगा लावत असतील आणि भारताच्या भविष्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक इथे आकार घेत असेल, तर आपल्या सारख्या सामान्यांना प्रश्न पडणं साहजिक आहे- नेमकं आहे तरी काय या ठिकाणी? कोणती अशी ताकद आहे जी जागतिक गुंतवणूकदारांना इथे खेचून आणतेय? कोणतं असं मॅग्नेट आहे ज्यामुळे भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक भविष्यासाठी हे शहर केंद्रबिंदू मानलं जातंय? तर हे आहे गुजरातमधील धोलेरा.
धोलेरा हे फक्त एक शहर नाहीये, तर भारताच्या पुढच्या औद्योगिक क्रांतीचा पाया आहे असं म्हणायला हवं. भारत जर भविष्यात जगातील मोठी manufacturing superpower बनण्याचं स्वप्न पाहत असेल, तर त्या स्वप्नाचा ब्लूप्रिंट आज धोलेरामध्ये तयार होत आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
काही वर्षांपूर्वीपर्यंत सामान्य लोकांसाठी फारसं परिचित नसलेलं हे नाव आता भारताच्या भविष्यातील आर्थिक, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीचं प्रतीक बनत चाललंय. भारताची पहिली Greenfield Smart Industrial City म्हणून ओळख मिळवणाऱ्या धोलेराकडे आज केवळ गुजरात किंवा भारतच नाही, तर जागतिक गुंतवणूकदारांचेही लक्ष लागले आहे. आगामी काळात भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा backbone म्हणून धोलेरा किती मोठी भूमिका बजावतो, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे.
गुजरातमधील अहमदाबादपासून काही अंतरावर असलेला धोलेरा परिसर… काही वर्षांपूर्वीपर्यंत फारसा चर्चेत नव्हता. खंभातच्या आखातालगतचा हा भाग मुख्यतः किनारी आणि ग्रामीण स्वरूपाचा मानला जायचा. शांत, विरळ वस्तीचा आणि पारंपरिक जीवनशैली जपणारा हा प्रदेश अचानक देशातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक चर्चेच्या केंद्रस्थानी येईल, असं कदाचित कुणालाही वाटलही नसेल. पण २१व्या शतकात भारताने एक मोठं स्वप्न पाहायला सुरुवात केली… जगातील प्रमुख manufacturing hub बनण्याचं… फक्त वस्तू आयात करणारा देश नाही, तर जगासाठी उत्पादन करणारा, तंत्रज्ञान विकसित करणारा आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा देश बनण्याचं… आणि अशा वेळी गरज होती एका अशा शहराची, जे केवळ आजसाठी नाही, तर पुढच्या कित्येक दशकांसाठी हे स्वप्न सत्यात उतरवायला मदत करेल.
भारतात अनेक शहरं आधी वाढली आणि मग त्यांच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. पण धोलेरामध्ये ही प्रक्रिया नेमकी उलटी आहे — आधी ब्लूप्रिंटनुसार उभारणी, मग विकास. म्हणजेच काय जिथे आधीच रस्ते, इंडस्ट्रियल झोन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, डेटा कनेक्टिव्हिटी, ड्रेनेज आणि वीज व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने तयार केली जाणारेत आणि त्यानंतर उद्योग येतायत. आणि इथूनच सुरू होतोय धोलेराचा प्रवास.
तब्बल ९२० चौरस किलोमीटरमध्ये विकसित होणारं हे ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर भारतातील सर्वात मोठ्या pre-planned infrastructure प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. “ग्रीनफिल्ड” म्हणजे अगदी शून्यातून उभारलेला प्रकल्प — जिथे आधी मोठं शहर अस्तित्वात नव्हतं, तिथे आधुनिक शहराची निर्मिती…
धोलेराचं लोकेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. अहमदाबादपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अर्थात DMIC चा महत्त्वाचा भाग मानला जातो. शिवाय सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर आणि मुंबईसारख्या औद्योगिक केंद्रांशी त्याची कनेक्टिव्हिटी भविष्यात आणखी मजबूत होणार आहे. म्हणजेच… जर भारताच्या औद्योगिक नकाशाकडे शरीराच्या रक्तवाहिन्यांसारखं पाहिलं, तर धोलेरा हे भविष्यातील महत्त्वाचं “सर्क्युलेशन पॉइंट” बनू शकतं.
या शहरामागचा उद्देश फक्त कारखाने उभे करणं नाही. तर उद्योग, तंत्रज्ञान, निवास, शिक्षण, आरोग्य आणि आधुनिक नागरी जीवन यांची संतुलित ecosystem तयार करणं आहे. म्हणजेच “कामासाठी शहर” नाही… तर “भविष्यासाठी शहर”. धोलेरामध्ये रुंद रस्ते, स्मार्ट युटिलिटी नेटवर्क, सोलर एनर्जी, मेट्रो कनेक्टिव्हिटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोठ्या प्रमाणावर औद्योगिक झोन विकसित करण्याचा मास्टर प्लॅन आहे. आणि हे केवळ नियोजन कागदावरचे नाही तर आता प्रत्यक्षात देखील उतरू लागले आहे. त्यामुळेच सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर्स आणि advanced manufacturing क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचं लक्ष या भागाकडे वेधलं जात आहे.
धोलेरा आज ज्या वेगाने भारताचं next-generation infrastructure model म्हणून समोर येत आहे, ते काही एका दिवसात घडलेलं नाही. या प्रकल्पामागे अनेक वर्षांचं नियोजन, दूरदृष्टी, प्रशासनातील समन्वय आणि टप्प्याटप्प्याने केलेली अंमलबजावणी दडलेली आहे. धोलेराच्या विकासाला निर्णायक वळण मिळालं ते २००९ मध्ये. याच काळात दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच DMIC या भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्पांमध्ये धोलेराची प्रमुख केंद्र म्हणून निवड करण्यात आली. देशाच्या पश्चिम किनारपट्टीला औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स शक्तीमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने धोलेराला रणनीतिक महत्त्व प्राप्त झालं. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जमीन, समुद्राजवळील स्थान आणि पुढील पिढीचं शहर म्हणून विस्तारासाठी असलेली क्षमता यामुळे धोलेरा नजरेत भरलं.
यानंतर २०१३ मध्ये या शहराच्या प्राथमिक नियोजनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. देशांतर्गत खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आणि शहरी नियोजन तज्ज्ञ यांच्या सहकार्याने धोलेरासाठी आधुनिक आराखडा तयार करण्यात आला. भविष्यातील उद्योग, निवासी क्षेत्र, लॉजिस्टिक्स नेटवर्क आणि स्मार्ट सार्वजनिक सेवांचा एकात्मिक इकोसिस्टम म्हणून विकसित करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीपासूनच रस्ते, भूमिगत युटिलिटी नेटवर्क, डेटा कनेक्टिव्हिटी, जलव्यवस्था आणि औद्योगिक झोनिंग यांचं नियोजन जागतिक दर्जाच्या मानकांनुसार करण्यात आलं.
२०१६ मध्ये भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनशी संबंधित प्रकल्पांमुळे धोलेराच्या विकासाला आणखी गती मिळाली. डिजिटल प्रशासन, स्वयंचलित सार्वजनिक सेवा, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणपूरक नियोजन यांचा समावेश या संकल्पनेत करण्यात आला. २०१९ ते २०२३ या काळात धोलेरामध्ये प्रत्यक्ष पायाभूत सुविधा उभ्या राहण्यास सुरुवात झाली. विस्तीर्ण रस्ते नेटवर्क, अत्याधुनिक वीज प्रणाली, जलपुरवठा व्यवस्था आणि धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम वेगाने सुरू करण्यात आलं. या टप्प्याने धोलेराला केवळ कागदावरील स्मार्ट सिटी प्रकल्प न ठेवता प्रत्यक्षात आकार घेणारं औद्योगिक शहर म्हणून ओळख मिळवून दिली.
धोलेरासारखं प्रचंड आणि भविष्योन्मुख शहर उभं करणं म्हणजे फक्त जमीन विकसित करणं नव्हे… तर शून्यातून संपूर्ण urban ecosystem तयार करणं. आणि यासाठीच गुजरात राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक विशेष यंत्रणा उभी केली — Dholera Industrial City Development Limited अर्थात DICDL. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NICDC ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेली ही संस्था धोलेराच्या विकासाची मुख्य जबाबदारी सांभाळते. साध्या भाषेत सांगायचं झालं, तर धोलेराच्या ब्लूप्रिंटला प्रत्यक्ष जमिनीवर आकार देण्याचं काम DICDL करत आहे.
धोलेरा अजून पूर्ण शहर बनलेलं नाही… धोलेराबद्दल अनेक मोठमोठ्या घोषणा ऐकायला मिळतात. “भारताचं भविष्यातील स्मार्ट औद्योगिक शहर”, “सेमीकंडक्टर हब”, “ग्रीनफिल्ड मेगासिटी” — असे अनेक शब्द या प्रकल्पाशी जोडले जातात. पण प्रत्यक्षात जमिनीवर किती काम झालंय? धोलेरा खरंच आकार घेतोय का? आज या प्रश्नाचं उत्तर “हो” असं देता येईल. कारण काही वर्षांपूर्वी जिथे मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आणि विरळ वस्ती दिसत होती, तिथे आता टप्प्याटप्प्याने आधुनिक औद्योगिक शहराचा पाया उभा राहताना दिसतोय.
धोलेरा प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे “Activation Area”. सुमारे २२.५ चौरस किलोमीटरमध्ये विकसित होणारा हा परिसर धोलेराचा पहिला operational zone मानला जातो. याच भागातून संपूर्ण स्मार्ट शहराच्या विकासाची सुरुवात करण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणावर trunk infrastructure विकसित करण्यात आलं आहे. म्हणजेच मुख्य रस्ते, भूमिगत utility ducts, पाणीपुरवठा व्यवस्था, ड्रेनेज नेटवर्क आणि वीज वितरण यंत्रणा आधीच उभारण्यात येत आहे. हा परिसर भविष्यात संपूर्ण स्मार्ट सिटी कशी दिसेल याचे एक प्रायोगिक प्रात्यक्षिक म्हणून काम करतो. या क्षेत्रातून मिळालेल्या सर्व अनुभवांचा उपयोग धोलेराच्या उर्वरित भागाचा आणखी जास्त कार्यक्षमतेने विस्तार करण्यासाठी केला जात आहे.
विशेष म्हणजे या भागात utility corridor संकल्पना वापरण्यात आली आहे. साधारणपणे भारतातील अनेक शहरांमध्ये रस्ते पुन्हा पुन्हा खोदावे लागतात — कधी पाण्याच्या पाइपलाइनसाठी, कधी इंटरनेट केबलसाठी, तर कधी वीज लाईनसाठी. पण धोलेरामध्ये बहुतेक सेवा भूमिगत utility tunnel द्वारे जोडण्याची व्यवस्था तयार केली जातेय. त्यामुळे भविष्यात शहराची देखभाल अधिक सुलभ आणि व्यवस्थित होऊ शकते.
या झोनमध्ये विविध आकारांचे औद्योगिक भूखंड आधीपासूनच वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उद्योगाच्या प्रकारानुसार जागेचे नियोजन, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याने येथे उद्योग उभारणे अधिक सुलभ आणि वेगवान बनते. प्रत्येक भूखंडाला थेट रस्ते जोडणी, वीज, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि आधुनिक मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे उद्योगांना सुरुवातीपासूनच सक्षम वातावरण मिळते.
याशिवाय धोलेरा ॲक्टिव्हेशन झोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याला मिळालेली जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी. कोणत्याही औद्योगिक शहराच्या यशामागे मजबूत वाहतूक आणि लॉजिस्टिक नेटवर्कची महत्त्वाची भूमिका असते. धोलेरा एक्सप्रेसवेच्या माध्यमातून हा परिसर अहमदाबादशी थेट जोडला जाणारे. या अत्याधुनिक मार्गामुळे अहमदाबाद ते धोलेरा प्रवास दीड तासापेक्षा कमी वेळात पूर्ण होणार आहे. यामुळे उद्योग, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर बनणार आहे. धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जात आहे. ॲक्टिव्हेशन झोनपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर उभारला जात असलेला हा विमानतळ भविष्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी मोठे प्रवेशद्वार ठरणार आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने पाहिले तर धोलेराला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) जंक्शनची मोठी साथ मिळणार आहे. या कॉरिडॉरमुळे देशातील प्रमुख औद्योगिक आणि बंदर क्षेत्रांशी जलद व कार्यक्षम मालवाहतूक शक्य होणार आहे. इतकेच नव्हे, तर धोलेरा आणि अहमदाबाद यांना जोडण्यासाठी हाय-स्पीड मेट्रोची योजनाही आखण्यात आली आहे. भविष्यात ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर कर्मचारी, व्यावसायिक आणि नागरिकांसाठी दैनंदिन प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल.
धोलेराच्या विकासामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे क्षेत्र म्हणजे semiconductor industry. जगभरात चिप्सची वाढती मागणी आणि तंत्रज्ञानातील स्पर्धा लक्षात घेता, भारताने semiconductor manufacturing मध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे आणि त्या मिशनच्या केंद्रस्थानी आता धोलेरा झपाट्याने पुढे येताना दिसत आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानच्या Powerchip Semiconductor Manufacturing Corporation (PSMC) यांच्या सहकार्याने धोलेरामध्ये अत्याधुनिक semiconductor fabrication plant उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा प्रकल्प भारतातील सर्वात महत्त्वाच्या chip manufacturing initiatives पैकी एक मानला जातो. तैवानकडे semiconductor उत्पादनातील जागतिक अनुभव आणि टाटांची औद्योगिक क्षमता यांचा संगम भारतासाठी मोठी संधी मानली जात आहे.
भविष्यात automotive electronics, telecom, artificial intelligence (AI), consumer electronics आणि defence sector साठी लागणाऱ्या अत्याधुनिक chips चे उत्पादन याच प्रकल्पातून होऊ शकते. त्यामुळे भारताला परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार असून, देश जागतिक semiconductor supply chain मध्ये मजबूत स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे धोलेरा केवळ स्मार्ट सिटी म्हणून नाही, तर भारताच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक भविष्यातील “Semiconductor Hub” म्हणूनही उदयास येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
पण semiconductor manufacturing सारखे अत्याधुनिक उद्योग उभे करणं म्हणजे फक्त प्रचंड कारखाने बांधणं नाही… तर त्यामागे लागते अखंड आणि अत्यंत स्थिर ऊर्जा प्रणाली. कारण semiconductor fabrication plants हे अशा उद्योगांपैकी मानले जातात, जिथे काही सेकंदांसाठीही वीजपुरवठा खंडित होणं उत्पादन प्रक्रियेसाठी मोठं नुकसान ठरू शकतं. आणि इथेच धोलेराचा आणखी एक वेगळा पैलू समोर येतो — renewable energy आणि green infrastructure.
धोलेरामध्ये केवळ उद्योगांसाठी जागा तयार केली जात नाहीये… तर त्यांना चालना देणारी स्वच्छ ऊर्जा साखळीही उभी केली जात आहे. गुजरातच्या या भागाला नैसर्गिकरित्या मोठा भौगोलिक फायदा मिळतो. विस्तीर्ण मोकळं क्षेत्र, वर्षभर मुबलक सूर्यप्रकाश आणि किनारी भागातील वाऱ्याची क्षमता यामुळे हा परिसर renewable energy साठी अत्यंत अनुकूल मानला जातो. याच पार्श्वभूमीवर विकसित होणारा Dholera Solar Park हा संपूर्ण प्रकल्पाचा एक प्रमुख आधार मानला जात आहे. सुमारे ५ गिगावॅट क्षमतेपर्यंत विस्तारू शकणारा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या solar initiatives पैकी एक म्हणून पाहिला जातो. एवढ्या प्रमाणातील ऊर्जा भविष्यात मोठमोठे industrial zones, semiconductor units, data centres आणि smart infrastructure ला green power पुरवू शकते.
आजच्या डिजिटल युगात data म्हणजे नवीन इंधन बनलं आहे. आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज, online payment, OTT streaming, AI tools किंवा social media वरील प्रत्येक क्लिक… या सगळ्यामागे data centres सतत कार्यरत असतात. हजारो servers, networking systems आणि cooling infrastructure यांच्या मदतीने हे centres संपूर्ण डिजिटल जग सुरळीत चालवत असतात. भारतामध्ये AI, cloud computing, fintech आणि smart manufacturing झपाट्याने वाढत असल्याने data centres ची मागणीही वेगाने वाढत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर धोलेरा भारताच्या भविष्यातील digital infrastructure hub म्हणून पुढे येताना दिसत आहे.
मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जमीन, स्थिर वीजपुरवठा, high-speed connectivity आणि green energy यामुळे धोलेरा data centre उद्योगासाठी महत्त्वाचं ठरत आहे. यालाच बळ देत गुजरात सरकार आणि एल अँड टी व्योमा यांच्यात २५,००० कोटी रुपयांच्या AI Green Data Center प्रकल्पासाठी करार झाला आहे. २५० मेगावॅट क्षमतेचं हे अत्याधुनिक data centre २०२८ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असून, ते clean energy च्या मदतीने cloud computing आणि advanced data analytics सारख्या सेवा पुरवणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, धोलेरा भविष्यात भारताचं एक मोठं AI आणि digital hub म्हणून उदयास येऊ शकतं.
आज जगभरात Artificial Intelligence म्हणजेच AI ही केवळ नवीन technology राहिलेली नाही… तर ती पुढच्या औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीचा आधार मानली जात आहे. Chatbots, self-driving vehicles, smart factories, AI-powered healthcare, robotics, automation किंवा real-time data analytics — या सगळ्यामागे प्रचंड advanced digital infrastructure काम करत असतं.
आणि म्हणूनच AI economy उभी राहण्यासाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात — semiconductor chips, data centres आणि stable energy infrastructure. विशेष म्हणजे, या तिन्ही गोष्टींचं ecosystem धोलेरामध्ये एकाच ठिकाणी विकसित होताना दिसत आहे. म्हणजेच… AI industry ही फक्त software वर चालत नाही; तिच्यामागे एक विशाल physical infrastructure कार्यरत असतं. याच कारणामुळे जगभरातील अनेक देश आता AI-ready industrial ecosystems तयार करण्यावर भर देत आहेत. आणि भारतामध्ये धोलेरा त्या दिशेने उभा राहत असलेला एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.
पण इतक्या मोठ्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम नेमका कुठे दिसणार असेल… तर तो रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये. कारण धोलेरा हा केवळ कारखान्यांचा प्रकल्प नाही… तर लाखो लोकांसाठी नव्या आर्थिक संधी निर्माण करू शकणारी ecosystem म्हणून पाहिले जात आहे. Semiconductor manufacturing, electronics, renewable energy, logistics, construction, data centres, IT services यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, अशा मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये फक्त engineers किंवा मोठ्या कंपन्यांनाच संधी मिळते असं नसतं. एखादा मोठा उद्योग उभा राहिला की त्याभोवती transport, warehousing, food services, maintenance, retail, housing, healthcare आणि education यांसारख्या अनेक पूरक व्यवसायांची साखळी तयार होत जाते. म्हणजेच… एका मोठ्या औद्योगिक प्रकल्पाचा परिणाम संपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागतो. यामुळेच धोलेराकडे केवळ industrial city म्हणून नाही, तर भविष्यातील रोजगार आणि आर्थिक वाढीचं केंद्र म्हणूनही पाहिलं जात आहे. मात्र, याचबरोबर skilled workforce तयार करणं हे देखील तितकंच मोठं आव्हान असणार आहे. कारण semiconductor, AI, robotics आणि smart manufacturing सारख्या क्षेत्रांसाठी अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे आगामी काळात skill development, technical education आणि industrial training centres यांचं महत्त्वही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसू शकतं.
धोलेरामध्ये उद्योग, semiconductor projects, renewable energy आणि मोठ्या प्रमाणावर infrastructure development सुरू झाल्यानंतर आणखी एक क्षेत्र वेगाने चर्चेत येऊ लागलं आहे — real estate. कारण इतिहास पाहिला, तर जिथे मोठ्या प्रमाणावर उद्योग, connectivity आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात… तिथे housing आणि commercial development ची मागणी झपाट्याने वाढू लागते. धोलेरामध्येही काहीसं असंच चित्र दिसू लागलं आहे. विशेषतः expressway, international airport, industrial zones आणि semiconductor projects मुळे या परिसराकडे गुंतवणूकदार आणि developers यांचं लक्ष वेधलं जात आहे.
मात्र, धोलेराची real estate story ही इतर शहरांसारखी नाही. मुंबई, बेंगळुरू किंवा गुरुग्रामसारखी शहरं आधी organically वाढली आणि नंतर infrastructure त्यांच्यामागे आलं. पण धोलेरामध्ये आधी master planning, रस्ते, utility networks, zoning आणि industrial infrastructure उभारलं जात आहे… आणि त्यानंतर residential आणि commercial ecosystem आकार घेत आहे. त्यामुळे हा प्रकल्प “planned urban expansion” चं उदाहरण मानला जातो.
एकूणच पाहता, धोलेरा हा केवळ एक स्मार्ट सिटी प्रकल्प नाही… तर भारताच्या भविष्यातील आर्थिक आणि तांत्रिक महत्त्वाकांक्षांचा ब्लूप्रिंट आहे. Semiconductor chips पासून Artificial Intelligence पर्यंत… renewable energy पासून advanced manufacturing पर्यंत… आणि smart infrastructure पासून digital economy पर्यंत… भविष्यातील जग ज्या गोष्टींभोवती फिरणार आहे, त्या अनेक क्षेत्रांचा संगम आज धोलेरामध्ये निर्माण होताना दिसून येत आहे.
जगभरात आज देशांमध्ये स्पर्धा फक्त सैन्यशक्ती किंवा लोकसंख्येची राहिलेली नाही… तर technology, manufacturing capacity, semiconductor supply chain, energy security आणि digital infrastructure यांची झाली आहे. आणि या नव्या जागतिक स्पर्धेमध्ये भारताला मोठी भूमिका निभवायची असेल… तर धोलेरासारखी शहरं त्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरू शकतात. धोलेराकडे केवळ आणखी एका industrial project म्हणून नाही, तर “next-generation planned industrial ecosystem” म्हणून पाहिलं जात आहे.
पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे… काही वर्षांपूर्वीपर्यंत फारसं परिचित नसलेलं हे नाव आज भारताच्या भविष्यातील सर्वात चर्चेत असलेल्या प्रकल्पांपैकी एक बनलं आहे. आणि जर भारताने manufacturing, semiconductor, AI आणि digital economy मध्ये जागतिक स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल… तर त्या प्रवासात धोलेराचं नाव वारंवार समोर येताना दिसू शकतं. कदाचित म्हणूनच… आज धोलेरा केवळ गुजरातमधील एक शहर राहिलेलं नाही; तर भारताच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षांचं प्रतीक बनत चाललं आहे.
