घरबिजनेसअमेरिका- इराण चर्चेचा परिणाम; कच्चे तेल ३ टक्क्यांनी घसरले

अमेरिका- इराण चर्चेचा परिणाम; कच्चे तेल ३ टक्क्यांनी घसरले

भारतासह आयातदार देशांना फायदा

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेला मिळालेल्या प्रारंभिक यशामुळे जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतच्या चिंता कमी झाल्या असून, त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर दिसून आला आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

ब्रेंट क्रूडचा दर ८० डॉलरच्या खाली घसरून सुमारे ७९ डॉलर प्रति बॅरलवर आला, तर अमेरिकन डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ७५ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत होता. काही तासांपूर्वीच ब्रेंटचा दर ८२ डॉलरच्या पुढे गेला होता. मात्र, अमेरिका-इराण चर्चेनंतर बाजारातील वातावरण बदलले आणि गुंतवणूकदारांनी दिलासा व्यक्त केला.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि इराणवरील निर्बंधांमुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता चर्चेच्या माध्यमातून परिस्थिती सुधारण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेल बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.

विशेष म्हणजे, इराणच्या तेल निर्यातीवरील काही निर्बंध शिथिल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तेल आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या निर्यातीसाठी सवलती मिळाल्याचे संकेत दिले आहेत. तसेच गोठवलेल्या आर्थिक मालमत्तेचा काही भाग मुक्त करण्याबाबतही चर्चा पुढे सरकल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

विधान परिषद निवडणुकीत गुलाल महायुतीचाचं! १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व

शेअर बाजारात तेजी; आयटी, ऑइल-गॅस क्षेत्राची आघाडी

काश्मीर दौऱ्यावरून थरूर विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटला; काँग्रेसकडून टीका

कतारच्या रास लाफान एलएनजी प्रकल्पात भीषण स्फोट; ५४ जखमी

तेलाच्या किमतीतील ही घसरण भारतासारख्या मोठ्या आयातदार देशांसाठी सकारात्मक मानली जात आहे. भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेल स्वस्त झाल्यास आयात खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचा परिणाम इंधन दर, महागाई आणि चालू खाते तूट यांवरही दिसून येऊ शकतो. दरम्यान, तेलाच्या किमती नरमावल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण दिसून आले. ऊर्जा खर्च कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले. तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजार मोठ्या संघर्षाची शक्यता गृहीत धरत नसल्याचे दिसत असले तरी पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे. त्यामुळे आगामी घडामोडींवर जागतिक बाजाराचे लक्ष कायम राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version