घरक्राईमनामागोवंडीत अल्पवयीनाचे अपहरण; जबरदस्तीने भीक मागायला लावली; ‘गुरू माँ’वर गुन्हा

गोवंडीत अल्पवयीनाचे अपहरण; जबरदस्तीने भीक मागायला लावली; ‘गुरू माँ’वर गुन्हा

अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तृतीयपंथी ‘गुरू माँ’ उर्फ बाबू अयान शेख ऊर्फ ज्योती याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे असून त्यांची पूर्वीपासून ओळख होती. काही काळापूर्वी मुलाच्या वागण्या-बोलण्यात झालेला बदल लक्षात आल्याने त्याच्या आईने त्याला उत्तर प्रदेशातील मूळ गावी पाठवले होते. मात्र, आरोपींनी तेथे जाऊन मुलाला फूस लावून पुन्हा मुंबईत आणल्याचे तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा:
​मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी ३.३७ कोटींचे १५४१ मोबाईल मूळ मालकांना परत

पश्चिम आशियातील तणावामुळे दुबई रिअल इस्टेट बाजारात घसरण

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘हिंदू- काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान

केरळमध्ये शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; सुरक्षारक्षकाला मारहाण
मुंबईत आणल्यानंतर आरोपींनी मुलाला जबरदस्तीने महिलांचे कपडे परिधान करण्यास भाग पाडले आणि लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यासाठी लावल्याचा आरोप आहे. तसेच, अनैसर्गिक संबंधांसाठी ग्राहकांना प्रवृत्त करण्यास भाग पाडून त्यातून मिळणारे पैसे स्वतःकडे ठेवत असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, मुलाचा शोध घेत असताना त्याची आई आरोपींच्या घरी पोहोचली असता मुलगा पूर्णपणे बदललेल्या अवस्थेत आढळला. यानंतर तिने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून त्याच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३९ (भीक मागण्यासाठी अपहरण), कलम १४२ (बेकायदेशीर डांबून ठेवणे) तसेच ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत कलम ४, ६, ८ व १२ (लैंगिक अत्याचार) यांसह तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या आरोपीचा शोध सुरू असून वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणातील शोषणाचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version