वर्सोवा येथील देवाची वाडी समुद्रकिनाऱ्यावर गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून भाजीविक्रेते बसंतलाल सुकदेव कोरी यांची हत्या करून मृतदेह गोणीत भरून समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष मिश्रा याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य साथीदार अशा सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जुगराज रामनाथ यादव (५९), संतोष वृंदावन मिश्रा (६५), शिवम संतोष मिश्रा (२७), मीरा संतोष मिश्रा (५६), अंजू संतोष मिश्रा (३४) आणि वंदना संतोष मिश्रा (२९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह आढळल्याने खळबळ
१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील देवाची वाडी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर गोणीत बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर परिमंडळ-१ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांची सहा विशेष तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि विविध तपास पद्धतींच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृताचे नाव बसंतलाल सुकदेव कोरी असल्याचे स्पष्ट झाले. तो मालाड पश्चिम येथे संतोष मिश्रा याच्याकडे भाजीविक्रीचे काम करत होता.
हे ही वाचा:
रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू
शत्रूला एकदा माफ करा, मित्राला दोनदा, देशद्रोह्याला कधीच नाही
तिरंगा मार्चपूर्वी दिल्ली पोलिसांनी दिपकेची गठडी वळली
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना ईडीचे समन्स
आरोपी कुटुंबासह पसार
बसंतलाल यांची ओळख पटताच पोलिसांनी संतोष मिश्रा याचा शोध सुरू केला. मात्र, तो संपूर्ण कुटुंबासह घरातून पसार झाल्याचे आढळले. त्याच्या दुकानातील इतर कामगारही मुंबईबाहेर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढवून तांत्रिक माहितीच्या आधारे दोन तपास पथके उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ७ ऑक्टोबर रोजी जुगराज यादव याला अटक करण्यात आली.
जुन्या भांडणातून हत्या
तपासादरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून बसंतलाल यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून समुद्रात फेकण्यात आला. त्यानंतर आरोपी वेगवेगळ्या राज्यांत पळून गेले होते.
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-९ च्या पथकाने मुख्य आरोपी संतोष मिश्रा आणि अन्य आरोपींचा शोध घेतला. १३ ऑक्टोबर रोजी त्यांना ताब्यात घेऊन वर्सोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास वर्सोवा पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी, वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपशिखा भाग्यश्री आव्हाड वारे, तपास अधिकारी, वर्सोवा गुन्हे प्रकटीकरण पथक, मालाड पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि गुन्हे शाखा युनिट-९ यांनी केली.
