घरक्राईमनामाघाटकोपरमध्ये भररस्त्यात रिटायर्ड लोको पायलटची हत्या

घाटकोपरमध्ये भररस्त्यात रिटायर्ड लोको पायलटची हत्या

१९ वर्षीय युवकाला अटक

घाटकोपर परिसराला गुरुवारी रात्री हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. विक्रोळी पश्चिम पार्क साईड येथे राहणारे सेवानिवृत्त रेल्वे लोको पायलट सुरेंद्र धोंडीराम पाचाडकर (६५) यांची भररस्त्यात लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. लुटीच्या उद्देशातून ही घटना घडली असावी, अशी प्राथमिक माहिती असून घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, १९ वर्षीय अमन वर्मा या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सुरेंद्र पाचाडकर हे विक्रोळी पश्चिम येथील आनंदगड, त्रिवेणी सोसायटीमध्ये कुटुंबासह राहत होते. मधुमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ते दररोज सायंकाळी विक्रोळी ते घाटकोपर असा पायी फेरफटका मारत असत. गुरुवारीही नेहमीप्रमाणे ते पायी बाहेर पडले होते.

रात्री सुमारे ९.३० वाजता घाटकोपर पश्चिम, सीजीएस कॉलनीतील जुनी फर्निचर गल्ली येथून जात असताना त्यांना संशयित अमन वर्मा याचा धक्का लागला. या किरकोळ धक्क्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि पुढे हाणामारीपर्यंत प्रकरण गेले. संतापलेल्या वर्माने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून पाचाडकर यांच्या डोक्यात प्रहार केला. गंभीर जखमी झाल्याने ते घटनास्थळीच कोसळले, तर संशयिताने तिथून पळ काढला.

हे ही वाचा:

मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी

नितीशकुमारांनी गृहमंत्रीपद भाजपाला दिले, खातेवाटप जाहीर

…अशी घ्या हिवाळ्यात डोळ्यांची काळजी !

“पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात रासायनिक शस्त्रे डागली”

घटनेनंतर एका पादचाऱ्याने पाचाडकर यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला माहिती दिली. सावत्र मुलगा अशोक साठे आणि आई शुभांगी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाचाडकर यांना जखमी अवस्थेत झायनोव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सूचना मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयित अमन वर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने घाटकोपर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version