आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना सहभागी होऊ न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या आयोजकांनी सहभागी होणाऱ्यांची ओळख तपासावी, तसेच आधारकार्ड तपासण्यासह कपाळावर टिळा लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. या भूमिकेवरून महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे.
यंदा नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विहिंपचे प्रवक्ते आणि संयुक्त सचिव श्रीराज नायर यांनी गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णय जाहीर केला.
श्रीराज नायर यांनी नवरात्र हा केवळ गाणी आणि नृत्याचा उत्सव नसून हिंदू देवीच्या उपासनेशी संबंधित धार्मिक उत्सव असल्याचे म्हटले. मुस्लिम मूर्तिपूजेच्या विरोधात असतील, तर त्यांनी या उत्सवात सहभागी का व्हावे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विहिंपने या मार्गदर्शक सूचना हिंदू सणांचे सांस्कृतिक स्वरूप जपण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा:
पुण्यात हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
मोदींचा टोला…लाल किल्ल्यावरून दिली ‘दिमागी नक्षल’ची होमिओपॅथिक गोळी
दिल्लीत आता जाती धर्मावरून काड्या
संयुक्त राष्ट्रांच्या नकाशात लडाख, जम्मू-काश्मीरबाबत तडजोड नाही!
नायर यांच्या म्हणण्यानुसार, या सूचना कोणत्याही विशिष्ट समाजाविरोधात नसून उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप कायम ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या खबरदारीच्या उपाययोजना आहेत.
विहिंपच्या भूमिकेवर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ देत विहिंपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
यावर श्रीराज नायर यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, विहिंप सामाजिक सलोखा आणि शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिमांनी नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह यावे, असेही नायर यांनी म्हटले. तसेच मुस्लिमांनी आपल्या मशिदींमध्ये किंवा निवासस्थानाजवळ नवरात्रोत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी विहिंपच्या भूमिकेला असंवैधानिक म्हटले. सण-उत्सव हे समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी तर अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांमुळे महाराष्ट्रातील शांतता आणि सामाजिक सलोख्याला धक्का लागू शकतो, असे म्हटले.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही मुस्लिमांना सार्वजनिक उत्सवांपासून सामूहिकरीत्या दूर ठेवण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार सण साजरा करण्याचा अधिकार असल्याचे सांगताना त्यांनी सार्वजनिक उत्सवांमध्ये मुस्लिमांना सहभागी होण्यास बंदी घालण्याला विरोध केला.
