घरसंपादकीयमुज्ताबाने सोनियांचा लेख वाचला असेल का?

मुज्ताबाने सोनियांचा लेख वाचला असेल का?

इराणचा नवा सर्वेसर्वा मुज्ताबा खामेनी याने बहुधा काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा लेख वाचला नाही. किंवा न्यूज पेपरचा वापर टॉयलेट पेपर सारखा केला असावा. या लेखाच्या निमित्ताने काँग्रेसने पूर्णपणे वातावरण निर्मिती केली. भारताचे धोरण कसे पूर्णपणे इस्त्रायल धार्जिणे झाले आहे. इराणच्या विरोधात गेले आहे, याबाबत काँग्रेसचे चवचाल प्रवक्ते भरपूर चर्वितचर्वण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नीतीमुळेच स्ट्रेट ऑफ होर्मुज भारतासाठी खुले होणार नाही, अशी चिखलफेक करत होते. आता होर्मुजमधून भारतीय मालवाहू जहाजे येजा करीत आहेत. काँग्रेसचे नेते इराणचे आभार मानतायत.

इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका असे युद्ध सुरू झाल्यानंतर एलपीजीचा कथित तुटवडा निर्माण झाला असा दावा करून काँग्रेसने संसदेत, रस्त्यावर हंगामा सुरू केला. मोदींच्या डोक्यावर खापर फोडायला सुरूवात केली. चार मुद्दे सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत यूपीएचा काळ हा अधिक सुखकर होता. डॉ.मनमोहन सिंह हे मोदींपेक्षा मजबूत आणि सक्षम पंतप्रधान होते. सोनिया गांधी या परराष्ट्र धोरणाच्या जाणकार आहेत आणि राहुल गांधी हे देशाचा गाडा मोदींपेक्षा जास्त चांगल्या रितीने हाकू शकतील.

मोदींचे परराष्ट्र धोरण कसे चुकीचे आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आधी सोनिया गांधी यांनी वर्तमान पत्रात लेख लिहीला. आपण इस्त्रायलच्या बाजूने म्हणजे इराणच्या विरोधात आहोत, असा त्या लेखाचा सूर होता. होर्मुजची खाडी चीन आणि रशियासाठी खुली आणि भारतासाठी बंद होणे हे मोदींच्या कमकुवत नेतृत्वामुळे घडले आहे. डॉ.मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात इराण आणि भारताचे अत्यंत मजबूत संबंध होते, असा प्रचार काँग्रेसचे नेते आणि त्यांची इको सिस्टीम करते आहे. देशाला सध्या राहुल गांधी यांच्यासारख्या खंबीर आणि सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे, असा प्रचार काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून अविरत सुरू असतो.

हे ही वाचा:

‘शिवालिक’ एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात पोहोचला

बँकॉकहून आणलेले १२.६८ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई विमानतळावर १२.६८ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

आता आयसीसी ट्रॉफी चोरी करून आणणार का?

होर्मूजमधून तेल आणि गॅसने भरलेली जहाजे भारताच्या दिशेने येऊ लागली आहेत. इराणने फक्त चीन आणि रशियाला होर्मुजमधून वहीवाटीसाठी परवानगी दिली हा, दावा काँग्रेस नेत्यांना गिळावा लागला आहे.

शिवालिक, नंदगिरी भारतात दाखल झाले. ही दोन्ही मालवाहू जहाजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची असून त्यावर ९७२०० टन एलपीजी लादलेला आहे. मुंद्रा बंदरात ही दाखल झाली आहेत. होर्मुज परीसरात आणखी २२ जहाजे अडकली असून त्यावर ६११ प्रवासी आहेत. तीही लवकरच सुरक्षितपणे भारतात दाखल होतील. कारण होर्मूजची कोंडी फुटली आहे. मालवाहू जहाजांचे रक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाची तीन जहाजे ओमानच्या आखातात तैनात करण्यात आली आहेत. ओमान येथून गॅसोलिन आणणारा जग प्रकाश हा टॅंकरही निघाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इराणचे राष्ट्रप्रमुख मसूद पजशिकियान आणि डॉ.एस.जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागीछी यांनी फोन केल्यानंतर हा तिढा सुटला.   ‘भारत हा इराणचा मित्र आहे, भारताचा झेंडा असलेले टॅंकर होर्मुजमधून सुरक्षित येजा करतील’ असे इराणचे भारतातील राजदूत मोहमद फथाली यांनी जाहीरपणे सांगितले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का आहे. फथाली यांच्या विधानाचा अर्थ एवढाच आहे की होर्मुजचा तिढा सुटतो आहे. परंतु या काळात भारतीयांचा धीर कसा सुटेल, ते भयभीत कसे होतील, याची पूर्णपणे काळजी घेत काँग्रेसच्या इको सिस्टीमने देशात अफवांचा बाजार गरम केला आहे. जिथे रोज ५५ लाख सिलेंडरची बुकींग होते ती जनतेते घबराट निर्माण झाल्यामुळे ८० लाखावर पोचली आहे.

भारतात एलपीजीची वार्षिक मागणी ३१ ते ३३ दशलक्ष मे.टन आहे. त्यापैकी देशात १२ ते १३ दशलक्ष मे.टन निर्मिती केली जाते. साधारण ६० टक्के गॅस आपण आयात करतो. देशात सध्या १५ ते २० दिवसांचा साठा आहे. रशियानेही आर्क्टीकच्या सागरी मार्गाने भारताला गॅस पुरवठा करण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यामुळे भारताकडे आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. भारताचे धोरण मदत करा आणि मदत घ्या असे आहे. चाटुकारीचा आणि भलामण केली म्हणजे संबंध चांगले राहतात असा भ्रम काँग्रेसने जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळापासून बाळगला आहे. ही भूमिका मोदी सरकारने मोडीत काढलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयातुल्ला खामेनी यांनी श्रद्धांजली अर्पण केली नाही. त्यामुळे काही बिघडले नाही. दोन देशांचे संबंध एकमेकांच्या स्वार्थावर अवलंबून असतात, हे मोदींना ठाऊक आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा अन्न पुरवठादार देश आहे. गहू, तांदूळ, सोयाबिन, मोहरी, भूईमुग याबाबत तर आपण चीनलाही मागे सोडले आहे. आखातात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, चहा, साखर हे सगळे पदार्थ बहुतेक करून भारतातून जातात. जसे ते आखातात सौदी, युएई, बहरीन, कुवेत, ओमान, कतारकडे जातात तसे ते इराणलाही पुरवले जातात. तांदुळ, साखर, चहा, औषधे, इलेक्ट्रीक सामान, भारत इराणला निर्य़ात करतो. २०२४-२०२५ मध्ये  भारताने इराणला केलेली निर्यात १.२४ अब्ज डॉलर्सची आहे. चीन हा इराणचा सख्खा मित्र असला तरी त्यांचेच त्यांना पुरत नाही. २०२० मध्ये चीनने भारताला तांदूळ पाठवण्यासाठी विनंती केली होती. तेल आणि गॅस शिवाय एखाद्या देशाचे अडते तर तांदुळ आणि गव्हाशिवायही अडू शकते.

फक्त अन्नच नाही, भारत हा जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषधांचा पुरवठादार आहे. भारताला फार्मसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आज संपूर्ण आखाताला अन्न, औषधाची सर्वाधिक गरज आहे, अगदी शस्त्रांपेक्षा जास्त. युद्धाच्या काळात इराणच्या आयरीस लावणला आश्रय देण्याची ताकद भारताने दाखवली. अन्नाची गरजही भारत पूर्ण करतो आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण काँग्रेसच्या धोरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. ते वेगळे आहे म्हणून ते चुकीचे आहे, असा काँग्रेसचा तर्क असतो. हा तर्क सोनिया गांधी यांच्यापासून पवन खेरा यांच्यापर्यंत सगळेच करत असतात.

मोदी सरकारने काँग्रेसचे धोरण मोडीत काढले त्याचे कारण अत्यंत स्पष्ट आहे. काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक विषयांचे झालेले धिरडे जगाने पाहिलेले आहे. पंचशीलच्या नावाने चीनच्या गळ्यात गळे घालूनही चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले. जवाहरलाल नेहरु यांच्या परराष्ट्र धोरणाचे क्रियाकर्म केले त्यानंतरही काँग्रेसने परराष्ट्र धोरणातील ही चाटुकारीता कवटाळून ठेवली. डॉ.मनमोहन सिंह यांचे परराष्ट्र धोरण इतके मजबूत होते की, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांना देहाती औरत अशी उपमा दिली होती.

काँग्रेसमध्ये शशी थरुर यांच्यासारखे लोक आहेत, ज्यांना या क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. परंतु याबाबत बोलतात सुप्रिया श्रीनेत आणि खेरा, ज्यांना अनर्गल आरोप आणि चिखलफेकीशिवाय दुसरे काहीही येत नाही.

इराण-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती काय अनंत काळ राहणार नाही. कधी तरी हे संपणार आहे. युक्रेन रशिया युद्ध गेला बराच काळ सुरू आहे. परंतु त्याचा भारतावर फारसा परिणाम झाला नाही. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये ब्लॉकेड झाले नसते तर कदाचित इराण युद्धाचाही परिणाम झाला नसता. परंतु झालेल्या परिणामापेक्षा तो अधिक जाणवतोय त्याचे कारण काँग्रेस पक्षाचे देश विरोधी राजकारण आहे. यात अपरिपक्वतेपेक्षा विखारी आणि देशविरोधी राजकारणाचा भाग जास्त आहे. सत्तेसाठी काँग्रेस पक्ष कोणत्याही थराला जायला तयार आहे. परंतु असे चाळे करून सत्ता मिळण्याची शक्यता कमी येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तोंडात पुन्हा माती जाण्याची शक्यता जास्त आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version