कॅनडातील एडमंटन शहरात प्रार्थना सुरू असताना गुरुद्वारात चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी २७ वर्षीय संशयिताला अटक केली आहे. ही घटना नानकसर गुरुद्वारात घडली. पोलिसांनी हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
एडमंटन पोलिसांच्या माहितीनुसार, प्रार्थना सुरू असताना आरोपी गुरुद्वारात दाखल झाला. त्याने प्रार्थना कक्षात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ७५ आणि ५१ वर्षांच्या दोन पुरुषांवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी या दोघांना भाविक असल्याचे सांगितले आहे. मात्र, गुरुद्वाराच्या उपाध्यक्ष झोरा ग्रेवाल यांच्या म्हणण्यानुसार, जखमींपैकी एक पुजारी तर दुसरा स्वयंसेवक आहे.
हल्ला होताच गुरुद्वारातील काही उपस्थितांनी धाडस दाखवत आरोपीला पकडले आणि पोलिस येईपर्यंत त्याला नियंत्रणात ठेवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जखमा जीवघेण्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीलाही दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हे ही वाचा:
मॅकडोनाल्ड्ससह १३ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित
…म्हणून ‘सीजेपी आंदोलन हा एक अर्बन नक्षलवाद!’
गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी अतिरिक्त लोकल-मेट्रो धावणार
‘हिंदू-मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या’
पोलिसांच्या चौकशीत आरोपीचा यापूर्वीपासून गुन्हेगारी इतिहास असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यासह हिंसाचाराशी संबंधित अनेक प्रकरणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, आरोपीला हल्ल्याच्या एक दिवस आधीच अल्बर्टा येथील फेडरल तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला एडमंटनमधील नियुक्त हाफवे हाऊसमध्ये हजर राहणे आवश्यक होते. मात्र, तो तेथे हजर झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
