अमेरिकेतील फोर्ट हूड लष्करी तळावर २००९ मध्ये झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत १३ जणांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या माजी लष्करी मेजर निडाल मलिक हसन याला ३ डिसेंबर २०२६ रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक्सासमधील याच फोर्ट हूड लष्करी तळावर रायफलधारी सैनिकांच्या पथकाकडून गोळीबार करून त्याच्या मृत्युदंडाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या फाशीचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती पेंटागॉनमधील एका अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे. अमेरिकेत अशा प्रकारे फाशीचे थेट प्रक्षेपण करण्याचा हा अभूतपूर्व निर्णय ठरू शकतो.
गुरुवारी ‘रिअल अमेरिकाज व्हॉइस’ या माध्यमाशी बोलताना हेगसेथ यांनी सांगितले की, या मृत्युदंडाची प्रक्रिया लोकांना पाहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. अशा गंभीर गुन्ह्यांचे परिणाम काय असतात, हे लोकांना समजणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. तालिबानशी या मलिक हसनचे संबंध होते आणि त्यासाठीच त्याने अमेरिकन सैनिकांवर गोळीबार केला होता, असे चौकशीतून समोर आले होते.
हे ही वाचा:
नेपाळमधील महाप्रलयात १६,०५५ कोटींचे नुकसान
टीसीएसच्या नफ्यात १५ टक्क्यांची झेप
काँग्रेसची डबल ढोलकी! फडणवीसांनी जुना व्हिडिओ दाखवत घेरले
हसनने ज्या लष्करी तळावर गोळीबार करून अनेकांचा जीव घेतला, त्याच ठिकाणी त्याला मृत्युदंड देण्यात यावा, अशी भूमिका हेगसेथ यांनी मांडली. या शिक्षेसाठी रायफलधारी सैनिकांचे पथक तैनात केले जाणार असून, गुरुवारी दुपारी एक वाजता मृत्युदंडाची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सूचित केले. २००९ मध्ये हल्ला झाला होता, त्याच वेळेशी ही वेळ जुळवण्यात आली आहे. अमेरिकी लष्कराने हसनच्या फाशीची तारीख ३ डिसेंबर २०२६ निश्चित केली आहे.
काय आहे फोर्ट हूड गोळीबार प्रकरण?
निडाल मलिक हसन हा अमेरिकी लष्करात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. ५ नोव्हेंबर २००९ रोजी त्याने फोर्ट हूड लष्करी तळावर आपल्या सहकारी सैनिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ३२ जण जखमी झाले. अमेरिकेतील लष्करी तळावर झालेल्या सर्वांत भीषण गोळीबाराच्या घटनांपैकी ही एक घटना मानली जाते.
२०१३ मध्ये लष्करी न्यायालयातील ज्युरीने हसनला पूर्वनियोजित हत्येच्या १३ आणि पूर्वनियोजित हत्येचा प्रयत्न केल्याच्या ३२ आरोपांमध्ये दोषी ठरवले. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. खटल्यादरम्यान हसनने गोळीबार केल्याची कबुली दिली होती. अमेरिकेच्या सैन्याविरुद्धच्या संघर्षात आपण बाजू बदलली होती आणि तालिबानी लढवय्ये तसेच अन्य मुस्लिमांचे अमेरिकी सैन्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, असे त्याने म्हटले होते.
