घरन्यूज खिडकीलोअर परळमध्ये 'बेस्ट'चा थरार! भरधाव बस दुभाजकावर चढली

लोअर परळमध्ये ‘बेस्ट’चा थरार! भरधाव बस दुभाजकावर चढली

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसला गुरुवारी सकाळी लोअर परेल परिसरात अपघात झाला. भरधाव वेगात असलेली वातानुकूलित (AC) बस थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याने प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (२६ मार्च) सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडजवळ हा प्रकार घडला. ही बस नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर जाऊन धडकली. अपघाताचा जोर इतका होता की, बसचा पुढचा भाग दुभाजकावर पूर्णपणे अडकला होता.
हे ही वाचा:
मोदी-जयशंकर यांनी उठवला दोन दलालांचा बाजार…

देशात ६० दिवसांचा LPG, पेट्रोल-डिझेलचा साठा

मंत्री नरहरी झिरवळांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर

भारताकडून अनेक वर्षांनंतर इराणकडून LPG ची खरेदी

कमला मिल्स हा मुंबईतील प्रमुख व्यापारी केंद्रांपैकी एक असल्याने सकाळी या परिसरात मोठी वर्दळ असते. या अपघातामुळे रस्त्याच्या मध्यभागी बस अडकून पडल्याने दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि वाहनचालकांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

या अपघाताचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये पांढऱ्या रंगाची वातानुकूलित बस दुभाजकावर तिरकी झालेली स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बेस्टच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बस बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले.
या अपघातात कोणत्याही प्रवाशाला किंवा पादचाऱ्याला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे बेस्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version