दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (डीएसजीएमसी) आम आदमी पक्ष (आप) आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर गुरुद्वारा बंगला साहिबच्या पवित्रतेला धक्का पोहोचवून या धार्मिक स्थळाचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. गुरुद्वाराच्या परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर समितीने रविवारी, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आम आदमी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. या प्रकरणी आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी दिल्ली पोलिसांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात केजरीवाल आणि इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डीएसजीएमसीचे अध्यक्ष हरमीत सिंह कालका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी आम आदमी पक्षाशी संबंधित आंदोलकांच्या एका गटाने गुरुद्वारा बंगला साहिबच्या परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध करताना त्यांनी शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.
कालका म्हणाले, “गुरुद्वारा बंगला साहिबसारख्या पवित्र स्थळाला राजकीय आखाडा बनवण्याचे प्रयत्न होत असल्याचे पाहून अत्यंत दुःख होते. हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. येथे लोक प्रार्थना करण्यासाठी आणि आपल्या दुःखातून मुक्ती मिळावी म्हणून गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. मात्र, आंदोलकांनी येथे प्रवेश करून निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शीख समुदायाच्या भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत.”
कालका यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक जेव्हा गुरुद्वारामध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांच्या हातात कोणत्याही प्रकारचे फलक किंवा बॅनर नव्हते. त्यांच्याकडे केवळ पाठीवरच्या बॅगा होत्या. त्यानंतर आंदोलकांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी बॅगमधून पोस्टर्स आणि बॅनर बाहेर काढले, घोषणाबाजी केली आणि आंदोलन सुरू केले, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “गुरुद्वारामध्ये प्रार्थना करता येते; मात्र येथे आंदोलन करण्याची परवानगी नाही. कोणाला आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी संसद भवनाबाहेर किंवा ज्यांच्याविरोधात त्यांना आंदोलन करायचे आहे, त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करावे.”
हे ही वाचा:
दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनस्थळ नाही!
विजयने शिक्षण योजनेसाठी मोदींकडे केली ५ हजार कोटींची मागणी
दिल्लीतील सीजेपी आंदोलनावर पोलिसांची कारवाई
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाची भारताकडून खरडपट्टी
पोलिसांच्या गणवेशावरून दिशाभूल
या घटनेनंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी काही व्हिडिओ प्रसारित करून पोलिस कर्मचारी गणवेश आणि बूट घालून गुरुद्वारामध्ये दाखल झाल्याचा दावा केल्याचे कालका यांनी सांगितले. मात्र, हे व्हिडिओ दिशाभूल करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिस कर्मचारी गुरुद्वारातील मुख्य प्रार्थनास्थळ असलेल्या दरबार साहिबमध्ये प्रवेश करून गेले नव्हते. ते गुरुद्वाराच्या परिसरातील सार्वजनिक वापरासाठी खुल्या असलेल्या मार्गावरून गेले होते. या मार्गाचा वापर सामान्य नागरिकही ये-जा करण्यासाठी करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंजाबमधील राजकारणासाठी वापर
या संपूर्ण घटनेमागे पंजाबमधील राजकारण असल्याचा आरोपही डीएसजीएमसीच्या अध्यक्षांनी केला. आम आदमी पक्षाचे नेते या घटनेचा वापर राजकीय हेतूंसाठी करत असल्याचे ते म्हणाले. कालका म्हणाले, “या परिस्थितीचा जाणीवपूर्वक गैरवापर केला जात आहे. विशेषतः दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार या प्रकरणावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्यांना स्पष्टपणे सांगायचे आहे की, हे गुरुद्वारा आहे, तुमच्या राजकारणाचा आखाडा नाही. येथे असे राजकीय खेळ खेळले, तर गुरुसाहेब तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत.”
