महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेतील बहुमताचे गणित जुळवण्यास सुरुवात केली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आणखी काही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांच्या भूमिकेमुळे सरकारचे गणित जुळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभेची सध्याची प्रभावी सदस्यसंख्या ५४० असून, घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी ३६० मतांची आवश्यकता आहे. भाजपचे २४१, तेलुगू देसम पक्षाचे १६, शिवसेना (शिंदे गट) १३, जनता दल (युनायटेड) १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ८ आणि अन्य मित्रपक्षांचे मिळून एनडीएकडे सुमारे ३२० खासदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकारला आणखी ४० मतांची गरज आहे.
विरोधी पक्षांतील खासदारांवर नजर
यापूर्वी एप्रिलमध्ये हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी २९८ खासदारांनी बाजूने, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले होते. आता या २९८ मतांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, शिवसेनेतून शिंदे गटात आलेले सहा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे गटातील आठ खासदार, तृणमूलमधून बाहेर पडलेले २० खासदार आणि द्रमुकचे २२ खासदार यांची मते जोडल्यास सरकारचा आकडा ३५४ पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच आवश्यक बहुमतासाठी आणखी सहा मतांची गरज राहील.
समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांच्या मतदानाबरोबरच काही विरोधी खासदार अनुपस्थित राहण्याची शक्यताही सरकारच्या गणितात महत्त्वाची ठरू शकते. खासदार मतदानाला अनुपस्थित राहिल्यास प्रत्यक्ष मतदानातील सदस्यसंख्या कमी होऊन आवश्यक बहुमताचा आकडाही कमी होतो.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर
३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन
बनावट भारतीय सोशल मीडिया खात्यांमधून पाकच्या भारताविरोधात कुरापती
भारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल
दरम्यान, सरकारकडून विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळविल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणते पक्ष आणि खासदार सरकारच्या बाजूने उभे राहतात, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीसाठीची राजकीय गणिते निर्णायक ठरणार आहेत.
