भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने २०२६च्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सनसनाटी विजय मिळवत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू आणि चीनचा स्टार शि यूची याला पहिल्याच फेरीत पराभूत केले. सोमवारी नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात आयुषने २१-१४, १३-२१, २१-१९ असा विजय मिळवत स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर घडवून आणला.
अवघ्या २१ वर्षांच्या आयुषने ३० वर्षीय अव्वल मानांकित शि यूचीविरुद्ध तब्बल एक तासाहून अधिक काळ रंगलेल्या चुरशीच्या लढतीत जबरदस्त संयम दाखवला. विशेष म्हणजे ही आयुषची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदार्पणाचीच लढत होती.
नंबर-१ खेळाडूला धक्का
आयुष शेट्टी सध्या जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर आहे. त्याच्या तुलनेत शि यूची जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असून तो या स्पर्धेतील प्रमुख विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. मात्र आयुषने दबावाला अजिबात बळी न पडता सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये त्याने ८-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी १३-६ पर्यंत वाढवली.
शि यूचीने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र आयुषने आपला संयम कायम ठेवत पहिला गेम २१-१४ असा जिंकला. पहिला गेम गमावल्यानंतर शि यूचीने आपल्या अनुभवाचा वापर करत दुसऱ्या गेममध्ये खेळाची दिशा बदलली. चीनच्या या अव्वल खेळाडूने आयुषवर सुरुवातीपासून दबाव निर्माण केला आणि दुसरा गेम २१-१३ असा जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यामुळे निर्णायक तिसरा गेम अत्यंत महत्त्वाचा ठरला.
हे ही वाचा:
कुस्तीच्या आखाड्यात गीतिकांची ‘दंगल’!
नंबर-३ साठी टीम इंडियात महासंग्राम!
भाजपाची ‘नबीन’ जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव
झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा
निर्णायक गेममध्ये आयुषचा संयमी खेळ
तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूसमोर खेळताना आयुषने कोणतीही घाई केली नाही. महत्त्वाच्या क्षणी त्याने आक्रमक फटके आणि बचावात्मक खेळ यांचा योग्य समतोल साधला. अखेर त्याने निर्णायक गेम २१-१९ असा जिंकत सामना आपल्या नावावर केला. अंतिम गुण मिळताच नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयुषच्या विजयाचा जल्लोष झाला.
या सामन्यापूर्वी आयुष आणि शि यूची यांच्यात तीन वेळा सामना झाला होता आणि तिन्ही सामन्यांत आयुषचा पराभव झाला होता. मात्र त्या तीन सामन्यांपैकी दोन लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. गेल्या वर्षी इंडोनेशिया मास्टर्समध्ये शि यूचीने आयुषचा २१-१९, २१-१९ असा पराभव केला होता. यानंतर याच वर्षी मलेशिया ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत दोघांची पुन्हा गाठ पडली. त्या सामन्यात शि यूचीला आयुषवर विजय मिळवण्यासाठी तीन गेम खेळावे लागले होते. तब्बल एक तास दहा मिनिटे चाललेल्या त्या सामन्यात भारतीय खेळाडूने कडवी झुंज दिली होती.
एप्रिलमधील पराभवाचा घेतला बदला
दोघांची सर्वात अलीकडची लढत एप्रिलमध्ये निंगबो येथे झालेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झाली होती. त्या सामन्यात मात्र शि यूचीने आयुषला २१-८, २१-१० असे सहज पराभूत केले होते. त्या पराभवानंतर अवघ्या काही महिन्यांत आयुषने आपल्या खेळात मोठी सुधारणा केल्याचे या सामन्यात दिसून आले.
