घरस्पोर्ट्सलंकादहनासाठी टीम इंडिया सज्ज; विक्रमांसाठी हनुमानउडी!

लंकादहनासाठी टीम इंडिया सज्ज; विक्रमांसाठी हनुमानउडी!

गिल-जडेजासह कुलदीपही रचणार इतिहास? १५ ऑगस्टपासून विक्रमांची रंगणार लढाई

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मैदानावर भारताचा संघ श्रीलंकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी उतरणार असला, तरी भारतीय खेळाडूंच्या नजरा काही मोठ्या वैयक्तिक विक्रमांवरही खिळल्या आहेत. शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासमोर या मालिकेत इतिहास घडवण्याची संधी आहे.

गिलच्या भात्यातून शतक निघालं तर…

शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक झळकावले, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्रात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज होण्याची त्याला संधी आहे. गिलच्या नावावर सध्या ५ शतके आहेत.

इतकंच नाही, तर गिलने या मालिकेत २ शतके ठोकली, तर भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तो थेट सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. कर्णधार म्हणून गिलच्या नावावर सध्या ६ शतके, तर सचिनच्या नावावर ७ शतके आहेत.

जडेजाला ३५० विकेटचा टप्पा खुणावतोय!

रवींद्र जडेजासाठीही ही मालिका खास ठरण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी जडेजाला फक्त २ विकेट्सची गरज आहे.

हा टप्पा गाठताच ३५० कसोटी विकेट्स घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरेल. यापूर्वी अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, कपिल देव आणि हरभजनसिंग यांनी ही कामगिरी केली आहे.

कुलदीप फक्त एका विकेटवर!

फिरकीपटू कुलदीप यादवच्या नजरेसमोरही मोठा विक्रम आहे. आशियाई परिस्थितीत खेळताना कुलदीपने आतापर्यंत २४९ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध एक विकेट घेताच आशियात २५० आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रम त्याच्या नावावर जमा होईल. या मालिकेत कुलदीपची फिरकी भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

गिलला बिशन बेदींना मागे टाकण्याची संधी

कर्णधार म्हणून शुभमन गिलसमोर आणखी एक मोठा विक्रम आहे. भारताने श्रीलंकेचा मालिकेत २-० असा धुव्वा उडवला, तर कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत गिल बिशनसिंग बेदींना मागे टाकेल.

गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी ५ सामने जिंकले, तर ३ सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, बिशन बेदींच्या नेतृत्वाखाली भारताने २२ कसोटींमध्ये ६ विजय मिळवले होते.

जडेजाच्या निशाण्यावर ईशांत शर्माचा विक्रम

श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जडेजा सध्या ६व्या क्रमांकावर आहे. त्याने ७ सामन्यांत ३३ विकेट्स घेतल्या आहेत.

आता जडेजाने आणखी ४ विकेट्स घेतल्या, तर तो ईशांत शर्माच्या ३६ विकेट्सचा विक्रम मागे टाकेल आणि श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत टॉप-५मध्ये प्रवेश करेल.

म्हणजेच, १५ ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका केवळ भारत-श्रीलंका यांच्यातील लढत नसेल; तर भारतीय खेळाडूंच्या विक्रमांचीही रंगतदार शर्यत असेल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version