ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेटांच्या ऐतिहासिक टप्प्यापासून अवघ्या पाच विकेट दूर असला, तरी वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाच्या यशालाच सर्वाधिक महत्त्व देत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून तो तब्बल १३ महिन्यांनंतर पुनरागमन करणार आहे.
ऑस्ट्रेलियाला पुढील १२ महिन्यांत तब्बल २१ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे हेझलवूडसह संपूर्ण वेगवान गोलंदाजी फळीवर मोठी जबाबदारी असणार आहे. डार्विन येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जर त्याने पाच विकेट्स घेतल्या, तर तो ३०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलियाचा सातवा वेगवान गोलंदाज ठरेल. यापूर्वी डेनिस लिली, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी ही कामगिरी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना हेझलवूड म्हणाला, “मी कधीच वैयक्तिक टप्प्यांचा फार विचार करत नाही. भविष्यातील विक्रम डोळ्यासमोर ठेवला, तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. माझे संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर आणि संघाच्या विजयावर आहे.”
गेल्या हंगामात हॅमस्ट्रिंग आणि पिंडरीच्या दुखापतीमुळे तो अॅशेस मालिकेला मुकला होता. त्यामुळे पुनरागमनाची ही मालिका त्याच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. पुढील काळात इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या परदेशी मालिकांकडेही त्याचे लक्ष आहे.
“या तीन मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील. परदेशातील कसोटी सामने नेहमीच कठीण असतात. आम्ही सर्वोत्तम तयारी करून मैदानात उतरणार आहोत,” असेही तो म्हणाला.
व्यस्त कसोटी वेळापत्रकामुळे वर्कलोड मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे हेझलवूडने सांगितले. त्याने सहकारी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडचे कौतुक करत, त्याच्यासोबत अधिक सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
“बोलंडने प्रत्येक संधीचे सोनं केलं आहे. आमच्या गोलंदाजीच्या शैली काहीशा सारख्या वाटल्या तरी त्याच्यात वेगळी गुणवत्ता आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत आम्हाला एकत्र भरपूर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे,” असे हेझलवूड म्हणाला.
त्याने मायकल नेसर आणि ब्रेंडन डॉगेट यांचाही उल्लेख करत, आगामी कसोटी मालिकांमध्ये संपूर्ण वेगवान गोलंदाजी फळीची गरज भासणार असल्याचे सांगितले.
गेल्या काही आठवड्यांपासून ब्रिस्बेनच्या नॅशनल क्रिकेट सेंटरमध्ये कसोटी सामन्यांच्या धर्तीवर विशेष सराव केल्याचे सांगत हेझलवूड म्हणाला, “यावेळी आमचा सराव पूर्णपणे कसोटी क्रिकेट लक्षात घेऊन करण्यात आला. दिवसातून अनेक स्पेल टाकणे आणि सलग दिवस गोलंदाजी करणे यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या तयारीचा निश्चितच फायदा होईल.”
दुखापतीतून सावरलेला हेझलवूड आता वैयक्तिक विक्रमापेक्षा ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
