भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या नमन धीरने आपल्या पहिल्याच सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत ३१ धावांत ३ बळी घेतले. अक्षर पटेलला संथ गतीने गोलंदाजी करताना आणि खेळपट्टीवरून टर्न मिळवताना पाहून नमननेही त्याच योजनेचा अवलंब केला आणि त्याला त्याचा फायदा झाला.
लखनऊच्या इकाना स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नमन धीर आणि कुलदीप यादवच्या प्रभावी गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला १७१ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. कुलदीपने ३३ धावांत २ बळी घेतले.
भारताची सुरुवात मात्र अडखळत झाली. चार षटकांत भारताची धावसंख्या २ बाद ३५ अशी होती. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने अवघ्या ४२ चेंडूंत नाबाद १०० धावांची शतकी खेळी करत डाव सावरला. त्याला ईशान किशनने ३७ धावांची साथ दिली. भारताने अखेर ८ विकेट्सने विजय मिळवला.
सामन्यानंतर नमनने सांगितले की, आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे त्याला गोलंदाजीची फारशी संधी मिळत नसली, तरी तो सातत्याने गोलंदाजीचा सराव करत आहे. “मी बर्याच काळापासून गोलंदाजी करत आहे. आयपीएलमध्ये मला फार गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही, पण मी गोलंदाजी केलेली नाही असे नाही. मी खूप गोलंदाजी केली आहे,” असे त्याने सांगितले.
अक्षर पटेलच्या गोलंदाजीचे निरीक्षण केल्याचा फायदा झाल्याचेही नमनने स्पष्ट केले. “अक्षरला आधी गोलंदाजी करताना पाहिले. तो थोडा संथ चेंडू टाकत होता आणि त्याला टर्नही मिळत होता. त्यामुळे मीही थोडा संथ चेंडू टाकला तर खेळपट्टीवरून चांगली ग्रिप मिळेल, असा विचार केला. त्यानुसार मी माझ्या योजनेवर ठाम राहिलो,” असे नमन म्हणाला.
२५ वर्षीय नमन धीरला आयपीएलमध्ये प्रामुख्याने बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून वापरले जाते. मात्र, गोलंदाजीवरही तो तितकेच लक्ष देत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या टी-२० पदार्पणात ३ बळी घेणारा तो तिसरा भारतीय फिरकीपटू ठरला.
वेस्ट इंडिजविरुद्ध नमनला महत्त्वाच्या क्षणी यश मिळाले. शाई होपने ५२, तर शेरफेन रदरफोर्डने ५६ धावा केल्या होत्या. होपचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच नमनने त्याला बाद केले. त्यानंतर रोमारियो शेफर्ड आणि शमार स्प्रिंगर यांनाही त्याने माघारी धाडले.
आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बळीबद्दल नमन म्हणाला की, तो क्षण नक्कीच विशेष होता; मात्र त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे आखलेली योजना योग्य पद्धतीने मैदानात उतरवणे.
भारतीय संघात निवड झाल्याचा क्षणही नमनने आठवला. रणजी ट्रॉफीच्या शिबिरात असताना त्याला भारतीय संघात निवड झाल्याची माहिती मिळाली. त्याने लगेच वडिलांना फोन केला. “ते भावूक झाले आणि मीही थोडा भावूक झालो. प्रत्येक मुलाचे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे भारतीय संघात आपले नाव आले, हा माझ्यासाठी अविश्वसनीय अनुभव होता,” असे नमनने सांगितले.
