घरस्पोर्ट्सरणजी ट्रॉफीत जडेजाची एन्ट्री; सौराष्ट्रच्या संघात समावेश

रणजी ट्रॉफीत जडेजाची एन्ट्री; सौराष्ट्रच्या संघात समावेश

भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याचा रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या पहिल्या सामन्यासाठी सौराष्ट्रच्या १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. सौराष्ट्रचा पहिला सामना ११ ऑक्टोबरपासून छत्तीसगडविरुद्ध राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशी जिंकल्यानंतर जडेजा रणजी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यांत त्याने दोन बळी घेतले होते. फलंदाजीची संधी मात्र त्याला मिळाली नव्हती. रणजी ट्रॉफीतील सहभागामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी जडेजाला लाल चेंडूच्या क्रिकेटचा सराव करण्याची संधी मिळणार आहे.

सौराष्ट्रला जेतेपदाची आशा

रणजी ट्रॉफीच्या ९२ व्या पर्वाला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या सौराष्ट्रचा समावेश एलिट गट ‘ब’मध्ये करण्यात आला आहे. या गटात आंध्र, आसाम, छत्तीसगड, हैदराबाद, कर्नाटक, पंजाब आणि त्रिपुरा या संघांचाही समावेश आहे.

जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने २०१९-२० आणि २०२२-२३ या हंगामांत रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले होते. मात्र, मागील हंगामात संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा दमदार पुनरागमन करण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरणार आहे. मागील हंगामातील १४ खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे.

दोन नव्या चेहऱ्यांना संधी

निवड समितीने वेगवान गोलंदाज नील पांड्या आणि अष्टपैलू अर्थ यादव या दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. हार्विक देसाई याच्याकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. फलंदाजी विभागात अर्पित वासवदा, चिराग जानी आणि जय गोहिल यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल.

उनाडकट आणि डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया सौराष्ट्रच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. उनाडकटने ससेक्सकडून खेळताना सात सामन्यांत २२.२१ च्या सरासरीने २८ बळी घेतले आहेत.

दरम्यान, अनुभवी डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंह जडेजा याला सौराष्ट्रच्या संघातून वगळण्यात आले आहे. तो यंदाच्या हंगामात छत्तीसगड संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे सौराष्ट्रच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी पार्थ भुत याच्यावर असेल.

सौराष्ट्रचा संघ

जयदेव उनाडकट (कर्णधार), रवींद्र जडेजा, हार्विक देसाई (यष्टिरक्षक), अर्पित वासवदा, चिराग जानी, प्रेरक मांकड, जय गोहिल, चेतन सकारिया, अंकुर पंवार, समर गज्जर, पार्थ भुत, विश्वराजसिंह जडेजा, हेतविक कोटक, नील पांड्या, अर्थ यादव आणि तरंग गोहेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version