भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबत गांगुलीची ही पहिली औपचारिक कोचिंग भूमिका असणार आहे.
गांगुली २०१९ पासून दिल्ली कॅपिटल्सशी जोडलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी संघासोबत सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर पुरुष आणि महिला संघांसाठी ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ यासह विविध वरिष्ठ जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. आता ५४ वर्षीय गांगुली थेट डगआऊटमध्ये हेड कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्ससोबत गांगुलीचे नाते गेल्या ७ वर्षांपासून कायम आहे. या काळात त्यांनी संघाची क्रिकेटविषयक रचना मजबूत करण्यासोबतच पुरुष आणि महिला दोन्ही संघांसोबत काम केले आहे.
गांगुलीने या नव्या जबाबदारीबाबत उत्साह व्यक्त केला. “आयपीएलमध्ये हेड कोचची भूमिका पार पाडण्यासाठी मी उत्सुक आहे. दिल्ली कॅपिटल्स माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संघासोबत माझे घट्ट नाते आहे. मालक, व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंसोबत मी काम केले आहे. त्यामुळे ही माझ्यासाठी रोमांचक जबाबदारी आहे,” असे गांगुली म्हणाले.
“आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा समूह आहे. अलीकडच्या काळात संघाने चांगले क्रिकेट खेळले आहे. नव्या हंगामासाठी संघासोबत काम करण्यास आणि मजबूत, निर्भीड टीम उभी करण्यास मी उत्सुक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन आणि सहमालक पार्थ जिंदाल यांनी गांगुलीच्या नियुक्तीचे स्वागत केले. भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असलेल्या गांगुलीच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आयपीएल विजेतेपदासाठी दमदार आव्हान उभे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहमालक किरण कुमार ग्रांधी यांनीही गांगुलीच्या दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेटिंग स्ट्रक्चरवरील सखोल ज्ञानाचा संघाला मोठा फायदा होईल, असे सांगितले.
गांगुलीची नवी इनिंग
२०१९ पासून दिल्ली कॅपिटल्सशी जोडलेले गांगुली आता हेड कोच म्हणून संघाला मार्गदर्शन करणार आहेत. क्रिकेटपटू, कर्णधार, प्रशासक आणि आता प्रशिक्षक अशा विविध भूमिकांनंतर ‘दादा’ची आयपीएलमधील नवी इनिंग सुरू झाली आहे.
