दिल्लीतील २० जुलैच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान कथित पेलट गनच्या गोळीबारात जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोचाबच्या प्रकरणात अखेर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२१ ऑगस्ट) संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. २० जुलैला ही घटना घडल्यानंतर राहुल गांधी एका महिन्याने पोलिस ठाण्यात का गेले? याआधीच त्यांनी या प्रकरणात सदर तरुणाला न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असाही सवाल उपस्थित केला गेला.
राहुल गांधी शुक्रवारी जखमी विद्यार्थी साहिल लोचाब याच्यासोबत संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. साहिलच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यानंतर राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेरच आंदोलनाला बसले. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि पक्षाचे अन्य नेतेही आंदोलनात सहभागी झाले.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरोधात वंदे मातरम वादावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू असताना राहुल गांधी हे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पॅलेट गनच्या प्रकरणात पोलिस ठाण्यात गेले असा आरोप भाजपातर्फे करण्यात आला.
२० जुलै रोजी जंतर-मंतर येथे नीट पेपर लीक आणि परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान साहिलच्या डोळ्याला आणि पोटाला पेलट लागल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. साहिलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या एका डोळ्याची दृष्टी अद्याप स्पष्ट झालेली नाही. साहिलने १४ ऑगस्ट रोजी सात पानी तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र, एफआयआर दाखल करण्यात आली नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
हे ही वाचा:
एफडीधारकांसाठी मोठी बातमी! आता व्याजदराची माहिती रोज मिळणार
भारत-मॉरिशसदरम्यान ५ वर्षांचा मोठा इंधन करार
ब्रिटन-युरोपच्या गुंतवणुकीला भारताचा ‘ग्रीन चॅनेल’
अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण
राहुल गांधी यांनी पोलिसांकडे केवळ एफआयआरच नव्हे, तर या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्याचीही मागणी केली. पोलिसांकडून तक्रारीवर तत्काळ एफआयआर दाखल न झाल्याने त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. राहुल गांधींच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
