घरविशेषहिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!

हिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!

चिनी शोध पथक पोहचले दुर्घटनेच्या मूळ ठिकाणी

नेपाळच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी करणाऱ्या भीषण महापुरामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे. चिनी शोध पथक आणि तज्ज्ञांनी दुर्घटनेच्या मूळ ठिकाणी पोहोचून पाहणी केली असून, हिमनदी तलावाचा नैसर्गिक बांध फुटल्याने प्रचंड पाण्याचा लोंढा खाली आला असल्याचे समोर आले आहे. या नैसर्गिक आपत्तीला वैज्ञानिक भाषेत ‘ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड’ (GLOF) म्हटलं जातं.

चिनी शोध पथकाने हेलिकॉप्टरच्या मदतीने अत्यंत उंच आणि बर्फाच्छादित हिमनदी परिसराची पाहणी केली. सर्वेक्षणादरम्यान हिमनदीमध्ये विहिरीसारखा मोठा खोल खड्डा निर्माण झाल्याचं आढळलं. हिमनदीत तयार झालेल्या नैसर्गिक तलावातील पाण्याचा दबाव वाढल्याने बर्फाला मोठ्या भेगा पडल्या आणि त्यानंतर पाण्याचा मार्ग मोकळा झाला. तलावाचा नैसर्गिक अडथळा तुटताच मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी, चिखल, माती आणि दगडांचा प्रचंड प्रवाह वेगाने पर्वताच्या उतारावरून खाली आला. या पाण्याच्या लोंढ्याने नदीचा प्रवाह अचानक वाढला आणि सीमावर्ती भागात विनाशकारी पूरस्थिती निर्माण झाली.

हवाई पाहणीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वरून हिमनदी शांत दिसत असली, तरी तिच्या खालच्या भागातून अजूनही मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात अखंड पाण्याचा प्रवाह तयार झाल्याचं दिसून आलं आहे. शोध पथकाने अत्याधुनिक सेन्सर, ड्रोन, उपग्रह निरीक्षण आणि रिअल-टाइम कॅमेऱ्यांच्या मदतीने या भागाचा अभ्यास केला. हिमनद्यांमधील हालचाली, पाण्याची पातळी आणि भूभागातील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

हे ही वाचा:

नेपाळच्या महापुरात जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता

ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी

सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या

प्राथमिक पाहणीत ही आपत्ती मानवी कारणांमुळे किंवा ढगफुटीमुळे झालेली नसून, तापमानातील बदल आणि हिमनदी तलाव फुटल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हिमनदीतील बर्फ वितळल्याने तलावात पाण्याचा साठा आणि दबाव वाढला आणि अखेर नैसर्गिक बांध तुटला. दरम्यान, पर्यावरण तज्ज्ञांनी हिमालयीन पट्ट्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. तापमानवाढ आणि हवामानातील बदलामुळे हिमनद्या अस्थिर होत असून, भविष्यात GLOFसारख्या घटनांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version