फ्लायदुबईच्या विमानातील कॉकपिटमध्ये हल्ला झाल्यानंतर प्रसंगावधान राखत १७४ प्रवाशांसह क्रू मेंबर्सचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित माछर यांनी या थरारक प्रसंगाचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या संवादात सांगितला. यावेळी हल्ल्याच्या क्षणी आपण हनुमान चालीसा म्हणत असल्याचे सांगताना स्मित भावूक झाले. “हनुमानजींनीच मला वाचवले,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे स्मित यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावर स्मित यांनी हल्ल्याच्या वेळी नेमके काय घडले, याची माहिती दिली. त्या क्षणी आपण स्वतःच्या आयुष्यासाठी संघर्ष करत होतो, असे त्यांनी सांगितले. हल्ल्यात अनेक जखमा झाल्याने आपण खाली पडलो होतो. मात्र, गेल्या १७ वर्षांपासून विमान उडवत असल्याने विमानातील परिस्थिती समजून घेण्याचा अनुभव त्या क्षणी उपयोगी पडला. गेल्या ११ वर्षांपासून कॅप्टन म्हणून काम करत असल्याने विमान वेगाने खाली जात असल्याचे लक्षात आले. यानंतर मात्र आपण काहीतरी करणे गरजेचे असल्याचे स्वतःला सांगितले.
यानंतर कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतल्याचे स्मित यांनी सांगितले. “कॉकपिटचा दरवाजा इकडेच आहे,” असा विचार करून त्यांनी अखेर दरवाजा उघडला. त्यानंतर इतर प्रवासी मदतीसाठी पुढे आले. या प्रवाशांची भूमिकाही महत्त्वाची होती, असे स्मित यांनी आवर्जून सांगितले. आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यांना मारले जाताना पाहू शकत नव्हतो, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, या संपूर्ण प्रसंगात स्मित यांच्या मनात आणखी एक गोष्ट सुरू होती—हनुमान चालीसा. “जेव्हा माझ्यावर हल्ला झाला, तेव्हा मी फक्त हनुमान चालीसा म्हणत होतो. हनुमानजींनीच मला वाचवले,” असे स्मित यांनी सांगितले. हा प्रसंग सांगताना ते भावूक झाले. तसेच रोज सकाळी पूजा करताना आपल्या मुलालाही हनुमान चालीसा शिकवत असल्याचे त्यांनी नमूद केले. देशापासून दूर असलो तरी आपल्या संस्कृतीपासून दूर जाऊ शकत नाही, असे स्मित म्हणाले.
हे ही वाचा:
“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”
फ्लाय दुबईचा ‘तो’ हल्लेखोर वैमानिक जिहादी विचारसरणीचा
राहुल गांधींनी गौरवलेल्या ‘मोहम्मद दीपक’ला धमकी प्रकरणी अटक
कलिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह पलटवार
स्मित यांनी पंतप्रधान मोदी हे आपले सर्वात मोठे आदर्श असल्याचेही यावेळी सांगितले. “तुम्ही माझी चौकशी करत आहात याचा मला गर्व वाटत आहे,” असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी स्मित यांच्या उपचारांसाठी आणि सुरक्षेसाठी मदत केल्याबद्दल सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारांचे आभार मानले. दोन्ही देशांनी स्मित यांची चांगली काळजी घेतल्याचे मोदी यांनी सांगितले.
