घरविशेषमुंबईसह निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार

मुंबईसह निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार

उकाडा वाढणार

महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असून मुंबईसह राज्यातील निम्म्या भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी याबाबत माहिती दिली. सध्या मान्सूनच्या परतीची रेषा ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि कोकणातील हर्णे या भागातून जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारी जाण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. साधारणपणे महाराष्ट्रातून मान्सून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान माघारी जातो. मात्र, यंदा त्यापूर्वीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

मुंबईतही यंदा मान्सूनने सरासरीपेक्षा लवकर निरोप घेतला आहे. साधारणपणे ८ ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून माघारी जातो; मात्र यंदा ३ ऑक्टोबरलाच मुंबईतून मान्सूनने माघार घेतली. गेल्या २३ वर्षांच्या तुलनेत ही माघार लवकर झाली आहे. मान्सूनच्या परतीमुळे मुंबईतील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली असून, वातावरणात बदल जाणवू लागला आहे. पावसाळी ढगांची दाटी कमी होत असताना तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मुंबईकरांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
हे ही वाचा:
संसदीय समित्यांच्या फेररचनेत टीएमसीची दोन अध्यक्षपदे गेली

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे पदकांचे मानकरी

गोल्डवर भारताची मोहोर! ऑलिम्पिकचे तिकीट पक्के

ऑस्करच्या शर्यतीतील ‘गोंधळ’ आता सहा शहरांत
यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात पावसाचे वितरण मात्र असमान राहिले. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट तब्बल ५२ टक्के राहिली. मुंबईतही पावसाचे प्रमाण विभागानुसार वेगवेगळे राहिले. कुलाबा वेधशाळेत १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान १,९५७ मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे २,५३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कुलाब्यात सरासरीपेक्षा सात टक्के कमी, तर सांताक्रूझमध्ये नऊ टक्के अधिक पाऊस झाला.

मान्सूनच्या परतीची प्रक्रिया आता वेगाने पूर्ण होण्याची शक्यता असून, राज्यातील पावसाळी वातावरणाचा टप्पा संपण्याच्या मार्गावर आहे. पावसाचा प्रभाव कमी होत असताना अनेक भागांत कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरडे हवामान आणि वाढता उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनची माघार ही पावसाळ्याच्या अधिकृत समाप्तीची सुरुवात मानली जात असली, तरी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version