घरविशेषसलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता वाढली

मुंबईत ऑक्टोबर महिन्यातच वायुप्रदूषणाची समस्या गंभीर होऊ लागली असून शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः वरळी, वांद्रे आणि पश्चिम उपनगरांतील काही भागांमध्ये सायंकाळच्या वेळी हवेची गुणवत्ता अधिक खालावल्याने प्रदूषणाचे संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. पावसाळा संपल्यानंतर वातावरणातील बदल, मंदावलेले वारे, वाढती उष्णता आणि बांधकामांमधून उडणारी धूळ यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे. वाऱ्यांचा वेग कमी असल्याने धूलिकण आणि अन्य प्रदूषक हवेतच साचून राहत असून त्याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे.
‘समीर ॲप’वरील नोंदीनुसार, शनिवारी मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १२०, रविवारी १२७, तर सोमवारी ११४ नोंदवण्यात आला. हे आकडे मध्यम प्रदूषण श्रेणीत येत असले, तरी हवेतील पीएम २.५ या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण आरोग्यासाठी चिंताजनक ठरू शकते. या कणांमुळे श्वसनाचा त्रास वाढण्याची तसेच फुप्फुसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा किंवा श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. शहरातील वाढती बांधकामे, रस्त्यांवरील धूळ आणि वाहनांमधून होणारे उत्सर्जन यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
हे ही वाचा:
साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

गरब्यात मुस्लीम तरुणाची हुल्लडबाजी; विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला थप्पड

ॲपल इंडियाचा महसूल एक लाख कोटींच्या पार

जिओच्या आयपीओची गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता
मुंबईतील प्रदूषणाची समस्या केवळ काही दिवसांपुरती मर्यादित नसून हिवाळा जवळ येत असताना ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातच हवेचा दर्जा घसरत असल्याने आगामी काळात प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे लागू करणे, रस्त्यांची नियमित स्वच्छता करणे, वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवणे आणि हवेच्या गुणवत्तेची माहिती नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचवणे आवश्यक आहे. अन्यथा, विकासकामांच्या वेगाबरोबर प्रदूषणाचा विळखाही अधिक घट्ट होईल आणि मुंबईकरांना स्वच्छ हवेसाठी संघर्ष करावा लागेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version