घरविशेषमतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका

मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

देश, राज्य आणि जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार अविरत काम करत आहे. देशाला आत्मनिर्भर आणि जगातील तिसरी महाशक्ती बनवायचे असेल आणि राज्याचा, चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीला निवडून आणल्या शिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. मतपेढीचे आणि जातीजातीमध्ये विष कालवण्याचे हीन राजकारण करणा-यांना दूर लोटा आणि महायुतीला कौल द्या, असे आवाहन मंत्री गडकरी यांनी बुधवारी (१३ नोव्हेंबर) केले.

बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुनगंटीवार यांना निवडून देण्याचे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले. लोक कल्याणाच्या सरकारी योजनांचे लाभ जातीधर्मा पलिकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार झटत आहे. मात्र विरोधकांना केवळ जातीपातीचे राजकारण करायचे आहे अशी टीका मंत्री गडकरी यांनी केली.

आज सर्वत्र पायाभूत सुविधा बळकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शेतक-याला संपन्न करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बांबू पासून मिथेनॉल, बायो एव्हिएशन इंधन निर्मिती चंद्रपूर येथे होत असून, शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे. बल्लारपूर येथे मिथेनॉल सोबतच, अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प होणार असल्याचेही ते म्हणाले.

हे ही वाचा :

अनिल देशमुखांना क्लीन चीट नाही; फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

गौप्यस्फोटांना ऊत… मविआचे सरकार अदानींनी पाडले; पवारांच्या पाठिंब्याने?

‘बॅगेत कपडेच आहेत, युरीन पॉट नाही’

इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी ३७० कलम परत येणार नाही!

पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार सरकारच्या प्रयत्नामुळे ताडोबा जंगलात आज वायु आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्या लवकरच धावणार आहेत असेही त्यांनी नमूद केले.

तंत्रज्ञानाच्या बळावर आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारमुळे २०१४ पूर्वी एक ही किमी चा राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज डबल इंजिन सरकारमुळे तब्बल ४७४ किमी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नुकतेच नागपूर विमानतळाचे भूमीपूजन झाले. या विमानतळावरून शेतक-यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिले विमान झेप घेईल हा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. ५ हजार कोटींची महामार्ग बांधणीची कामे मंजूर झाली आहेत. चंद्रपूर मध्ये पाण्यावर उतरणारी विमानसेवा ही लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले. विकासाची आस असलेली बल्लारपूरची जनता तळमळीने काम करणाऱ्या महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार यांना जनता प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version