घरविशेषअमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटलाही वाचवले

अमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटलाही वाचवले

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली पुष्टी

इराणमध्ये पाडण्यात आलेल्या अमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटचा यशस्वी बचाव करण्यात आला असून तो आता सुरक्षितपणे देशाबाहेर काढण्यात आला आहे. हा अमेरिकन सैन्याने शत्रूच्या प्रदेशात केलेल्या सर्वात जटिल शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक मानला जात आहे, अशी माहिती रविवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अल जझिराला दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत याची पुष्टी केली. “आम्ही त्याला परत आणले आहे. तो पूर्णपणे सुरक्षित आहे,” असे त्यांनी सांगितले. पाडलेल्या एफ १५ ई स्ट्राइक इगल या लढाऊ विमानातील दुसरा क्रू सदस्य वाचवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांनी पुढे लिहिले की, “अमेरिकन सैन्याने गेल्या काही तासांत इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिम पार पाडली. हा अधिकारी एक अत्यंत आदरणीय कर्नल आहे.”

हे ही वाचा:

७ वर्षांनंतर भारताची इराणकडून पहिली तेल खरेदी

वायुसेना १००० किलोचे ६०० एरियल बॉम्ब करणार खरेदी; काय आहेत वैशिष्ट्ये?

इराणी तेल कार्गो चीनकडे वळवण्यासंबंधीचे दावे खोटे!

काँग्रेस-डाव्यांनी देशात “खोट्यांची फॅक्टरी” चालवली आहे

विमान पाडल्याचा दावा

इराणने दावा केला होता की, त्यांनी शुक्रवारी त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे अमेरिकेचे एफ १५ ई विमान पाडले. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा पहिलाच असा प्रकार होता. त्यानंतर अमेरिकन आणि इराणी सैन्य दोघांनीही पायलट्सचा शोध सुरू केला—अमेरिका त्यांना वाचवण्यासाठी, तर इराण त्यांचा वापर दबाव टाकण्यासाठी करू इच्छित होते. एक पायलट लगेच सापडला, पण दुसऱ्या (वेपन्स सिस्टम्स ऑफिसर) साठी शोधमोहीम सुरूच होती.

जीवावर बेतलेली परिस्थिती

दुसऱ्या पायलटला शत्रूच्या प्रदेशात लपून राहावे लागत होते, कारण इराणी अधिकाऱ्यांनी त्याचा माग काढला होता. याशिवाय, त्याला जिवंत पकडण्यासाठी ६० हजार डॉलर (सुमारे ₹50 लाख) बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

गोळीबारात बचाव मोहीम

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन दिवस लपून राहिल्यानंतर हा पायलट शोधण्यात यश आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पेंटॅगॉन २४ तास त्याच्यावर नजर ठेवून होते आणि त्याच्या बचावासाठी काटेकोर योजना आखत होते. या मोहिमेसाठी अनेक लढाऊ विमानं पाठवण्यात आली. मात्र बचावादरम्यान जोरदार गोळीबार झाला आणि परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली. तरीही अखेर पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. ट्रम्प यांनी सांगितले की पायलट जखमी झाला असला तरी तो लवकरच बरा होईल.

ट्रम्प यांचा इशारा

यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव वाढवत हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची मागणी केली. “४८ तासांत जर तसे झाले नाही, तर भीषण परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा त्यांनी दिला.

इराणचा इशारा

इराणकडूनही कडक प्रतिक्रिया देण्यात आली. जनरल अली अब्दुल्लाही अलियाबादी यांनी इशारा दिला की, “जर आमच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर तुमच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडले जातील.” या संघर्षात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत किमान १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून सुमारे ३०० जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version