ॲपलचा OpenAI वर गंभीर आरोप

व्यावसायिक गुपिते चोरल्याचा दावा

ॲपलचा OpenAI वर गंभीर आरोप

जगातील दोन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील संघर्ष आता न्यायालयात पोहोचला आहे. ॲपलने OpenAI आणि आपल्या दोन माजी वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरोधात अमेरिकेतील फेडरल न्यायालयात खटला दाखल करत गंभीर आरोप केले आहेत. OpenAI ने स्वतःचे AI-आधारित ग्राहक हार्डवेअर विकसित करण्यासाठी ॲपलची अत्यंत गोपनीय व्यावसायिक माहिती, उत्पादन डिझाइन्स, उत्पादन प्रक्रिया आणि पुरवठा साखळीशी संबंधित संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप कंपनीने केला आहे.

ॲपलच्या तक्रारीनुसार, कंपनीचे माजी वरिष्ठ अधिकारी टँग टॅन आणि चँग लियू यांनी नोकरी सोडण्यापूर्वी गोपनीय कागदपत्रे आणि तांत्रिक माहिती अनधिकृतपणे मिळवली. त्यानंतर ही माहिती OpenAI च्या हार्डवेअर प्रकल्पाला फायदा व्हावा यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही पुरवठादारांकडूनही ॲपलशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.
हे ही वाचा:
सोन्यातील घसरण ठरली सुवर्णसंधी!

तीन अर्धशतकांनंतरही भारताचा डाव २८५ धावांवर आटोपला

गाझामधील हवाई हल्ल्यांत हमासचे दोन कमांडर ठार

राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी २० जणांना जिल्हा सोडण्यास बंदी

विशेष म्हणजे, टँग टॅन हे ॲपलमध्ये आयफोन आणि ॲपल वॉचच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी होते. सध्या ते OpenAI च्या हार्डवेअर विभागाशी संबंधित वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. ॲपलचा आरोप आहे की, OpenAI ने नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षित केले आणि त्यांच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे, OpenAI ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीने स्पष्ट केले की, प्रतिस्पर्धी कंपन्यांची व्यावसायिक गुपिते मिळवण्यात त्यांना कोणताही स्वारस्य नाही. स्वतःच्या संशोधन, नवकल्पना आणि तांत्रिक विकासाच्या बळावरच कंपनी पुढे जात असल्याचे OpenAI ने म्हटले आहे.

या खटल्यामुळे AI उद्योगातील वाढती स्पर्धा पुन्हा एकदा समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी ChatGPT चे तंत्रज्ञान ॲपलच्या उपकरणांमध्ये समाविष्ट करण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सहकार्य झाले होते. मात्र आता AI हार्डवेअरच्या बाजारपेठेत दोन्ही कंपन्या थेट प्रतिस्पर्धी बनल्या असून, या कायदेशीर लढतीकडे संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा निकाल भविष्यात AI उद्योगातील बौद्धिक संपदा, कर्मचारी भरती आणि व्यावसायिक गोपनीयतेसंबंधी महत्त्वाचे कायदेशीर निकष ठरवू शकतो.

Exit mobile version