घरबिजनेसनेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

बिहारसह भूतानमध्येही जमीन हादरली

नेपाळमध्ये मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी ७ वाजून २ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भूकंपाचे धक्के केवळ नेपाळपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर भारत, भूतान, बांगलादेश आणि चीनमधील काही भागांमध्येही जाणवले. अचानक जमीन हादरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

नेपाळच्या कोशी प्रांतातील लेलेप परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीपासून सुमारे २० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र होते. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या भूकंपाची तीव्रता ५.३ नोंदवली आहे. मात्र, नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने या भूकंपाची तीव्रता ५.६ असल्याचे म्हटले आहे. नेपाळ-तिबेट सीमेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचेही स्थानिक माध्यमांच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले.
हे ही वाचा:
रामायणावरून ‘महाभारत’ कशाला ?

मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

दिल्ली पोलीस ठाण्यात नबीलने मारला नऊ कर्मचाऱ्यांना चाकू

कुर्ला हल्ला प्रकरणी ८-१० वयाची दोन मुले ताब्यात

भारतामध्ये बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळच्या वेळी अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेक ठिकाणी लोक घराबाहेर आणि मोकळ्या जागेत जमा झाले. भूतानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटे आसाममधील कार्बी जिल्ह्यातही २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा स्वतंत्र भूकंप नोंदवण्यात आला. त्याचे केंद्र जमिनीपासून १५ किलोमीटर खोलीवर होते. त्यामुळे ईशान्य भारतातील भूकंपाच्या हालचालींकडेही लक्ष वेधले गेले आहे.

हिमालयीन पर्वतरांगांचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. भारतीय आणि युरेशियन भूगर्भीय प्लेट्समधील हालचालींमुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता असते. नेपाळमध्ये यापूर्वीही मोठे भूकंप झाले असून त्यातून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, सध्याच्या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version