घरबिजनेससोन्याच्या आयातीला मोठा ब्रेक!

सोन्याच्या आयातीला मोठा ब्रेक!

मोदींच्या आवाहनानंतर १५ दिवसांत ७०% घट

देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक ताणाखाली आहेत. अशा परिस्थितीत मौल्यवान धातूंच्या बाजारातही मोठे बदल घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन आणि सरकारने वाढवलेले आयात शुल्क याचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे.

२७ मेपर्यंतच्या अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत भारतातील सोन्याच्या आयातीत तब्बल ७० टक्क्यांची घट झाली आहे. पूर्वी २२ टनांच्या आसपास असलेली आयात आता केवळ ७.५ टनांवर आली आहे. सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर परदेशातून सोने मागवणे अधिक महाग झाले आहे. त्यातच रुपयाचे डॉलरच्या तुलनेत झालेले अवमूल्यनही आयातीचा खर्च वाढवणारे ठरले आहे. त्यामुळे सोन्याच्या विक्रीत आणि खरेदीत मोठी घट नोंदवली जात आहे.
हे ही वाचा:
डॉलरसमोर रुपयाची दमदार मुसंडी

संरक्षण सचिव राजेश कुमार बनले डीआरडीओचे अध्यक्ष

२०३५ पर्यंत भारत बनणार सेमीकंडक्टर महासत्ता!

‘हिंदूंविरोधात मुस्लिमांना भडकवलं!’ ममता बॅनर्जींविरोधात तक्रार

शनिवार, ३० मे रोजी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात १० रुपयांची वाढ होऊन तो १,५७,६५० रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही १०० रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव २,८०,१०० रुपयांवर गेला आहे. काही बाजारपेठांमध्ये मात्र दर स्थिर राहिल्याचे चित्र दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण तणाव, जागतिक महागाईची भीती आणि डॉलरमधील चढ-उतार यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून पुन्हा सोन्याकडे वळत आहेत. दुसरीकडे सरकारचा परकीय चलन साठा वाचवण्याचा प्रयत्न आणि नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे देशातील सोन्याची मागणी कमी झाली आहे. अधिकमासामुळेही दागिन्यांच्या खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या आयातीत झालेली ही मोठी घट भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे व्यापार तूट कमी होण्यास आणि रुपयाला काहीसा आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगामी काळात जागतिक परिस्थिती, महागाईचा वेग आणि आयात धोरणातील बदल यावर सोन्या-चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार आहे. सध्या तरी सराफा बाजारात सावधगिरीचे वातावरण असून ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version