घरबिजनेसआयआरसीटीसीकडून एका दिवसात २० लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री

आयआरसीटीसीकडून एका दिवसात २० लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री

भारतीय रेल्वेचा नवा विक्रम

सणासुदीचा हंगाम सुरू होताच रेल्वे प्रवासासाठी तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच वाढत्या मागणीचा परिणाम आता आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगच्या आकडेवारीतही दिसून आला आहे. ७ सप्टेंबर २०२६ रोजी आयआरसीटीसीच्या माध्यमातून तब्बल २० लाख ६ हजार ३५३ रेल्वे तिकिटांची बुकिंग झाली. एका दिवसात झालेल्या तिकीट बुकिंगचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम ठरला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात एका दिवसात १८ लाख ४० हजार २०३ तिकिटांची बुकिंग झाली होती. यंदा हा विक्रम मोठ्या फरकाने मोडला आहे.

सणांच्या पार्श्वभूमीवर आगाऊ आरक्षण सुरू झाल्याने रेल्वे तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाली आहे. ८ सप्टेंबरलाही १९ लाख ५० हजार ६९९ तिकिटांची बुकिंग झाली. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या आरक्षित तिकिटांपैकी सुमारे ८९ टक्के तिकिटे आता ऑनलाइन बुक केली जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी लाखो प्रवासी संकेतस्थळावर दाखल होत असताना तिकीट बुकिंग यंत्रणेवर मोठा ताण येतो. मात्र, आयआरसीटीसीने केलेल्या तांत्रिक सुधारणांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील बुकिंगही कोणताही मोठा तांत्रिक अडथळा किंवा यंत्रणा बंद पडल्याशिवाय हाताळण्यात आली.
हे ही वाचा:
“आणीबाणी लावून सरकार चालवण्याची आमची नाही काँग्रेसची संस्कृती”

सौदीची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन ड्रोन हल्ल्यानंतर बंद

ब्रिक्समधला ‘आय’ मजबूत झालाय…

उत्तर प्रदेशात अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्याला अटक

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आयआरसीटीसीने आपल्या ‘नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग’ अर्थात ‘एनजीईटी’ प्रणालीची क्षमता जवळपास दुप्पट केली आहे. जुने सर्व्हर बदलून नवीन सर्व्हर बसवण्यात आले असून सॉफ्टवेअर आणि प्रणालीच्या रचनेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर १५ जुलै २०२६ पासून नव्या संकेतस्थळाच्या इंटरफेसची चाचणी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांना स्लीपर, वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि वातानुकूलित द्वितीय श्रेणीतील जागांची उपलब्धता एकाच स्क्रीनवर पाहता येते.

तिकीट बुकिंगमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठीही आयआरसीटीसीने कठोर पावले उचलली आहेत. बॉट ट्रॅफिक ५५ ते ६५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचा दावा आयआरसीटीसीने केला आहे. आरक्षण सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दहा मिनिटांत अधिकृत तिकीट एजंटांना आगाऊ आरक्षणाची तिकिटे बुक करता येत नाहीत. तसेच आरक्षण सुरू होताना आधार पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच तिकीट बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढलेली प्रचंड मागणी हाताळताना सामान्य प्रवाशांना तिकीट बुकिंगची संधी अधिक सुरळीतपणे मिळावी, यासाठी आयआरसीटीसीने आपल्या यंत्रणेत मोठे बदल केल्याचे या विक्रमातून स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version