घरबिजनेसपुणे बनतेय देशाचे ऑटोमोबाईल हब

पुणे बनतेय देशाचे ऑटोमोबाईल हब

चाकण-तळेगावमध्ये इलेक्ट्रिक वाहननिर्मितीला मोठी चालना

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा आता देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येत आहे. वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पुण्याला पसंती दिल्यामुळे या परिसराचे औद्योगिक महत्त्व वाढले आहे. टाटा, महिंद्रा, बजाज, मर्सिडीज-बेंझ आणि ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प येथे कार्यरत आहेत. सध्या या औद्योगिक पट्ट्यात २३ वाहननिर्मिती कंपन्या आणि वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या सुमारे ६ हजार ८५० कंपन्या आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक वाहनांबरोबरच इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचेही पुणे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.

चाकण परिसरातील इलेक्ट्रिक वाहननिर्मितीला आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. मर्सिडीज-बेंझने जर्मनीनंतर आपल्या ‘जीएलसी’ इलेक्ट्रिक मोटारीच्या उत्पादनासाठी चाकणची निवड केली आहे. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक मोटारींचे उत्पादन सुरू झाले असून, भविष्यात उत्पादन क्षमता वाढविण्याचे कंपनीचे नियोजन आहे. दुसरीकडे, ह्युंदाई कंपनीने तळेगाव येथे उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची सध्याची वार्षिक उत्पादन क्षमता १ लाख ७० हजार मोटारींची आहे. २०३० पर्यंत ही क्षमता वाढवून ३ लाख २० हजार मोटारींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने निश्चित केले आहे. त्यामुळे पुण्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळत आहे.
हे ही वाचा:
पुणे-लोणावळ्यातील १४ हॉटेल्ससह दोन डार्क स्टोअरवर एफडीएचा बडगा

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

राजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू

सामरिक तेलसाठा खोल खोल, चंडीखोल

‘सीबीआरई’च्या अहवालानुसार, २०२४ ते २०२६ या कालावधीत वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी देशभरात सुमारे ५४ लाख चौरस फूट औद्योगिक जागा भाडेतत्त्वावर घेतली. यामध्ये पुण्याचा वाटा २८ टक्के असून, देशात पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा वाटा २५ टक्के, चेन्नईचा २० टक्के, तर बंगळुरू आणि अहमदाबादचा प्रत्येकी १३ टक्के आहे. या आकडेवारीवरून वाहननिर्मिती कंपन्यांचा पुण्यावरील वाढता विश्वास आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठीची पसंती अधोरेखित होते.

मात्र, या औद्योगिक प्रगतीसमोर पायाभूत सुविधांचे आव्हान कायम आहे. चाकण परिसरातील खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही कंपन्यांनी या समस्यांमुळे स्थलांतराचा इशाराही दिला होता. त्यामुळे रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास तातडीने होणे आवश्यक आहे. जागतिक कंपन्यांची गुंतवणूक कायम राखण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहननिर्मितीतील भविष्यातील संधींचा लाभ घेण्यासाठी चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा नियोजनबद्ध विकास महत्त्वाचा ठरणार आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version