घरराजकारणभाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामराव वडकुते यांची ओळख मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रभावी नेते म्हणून होती. सामाजिक कार्यातून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विविध स्तरांवर काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि २००४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांसह शेळी-मेंढीपालन व्यवसायाच्या विकासासाठीही प्रयत्न केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आणि समाजाच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर ते सातत्याने भूमिका मांडत होते.
हे ही वाचा:
राजस्थानमध्ये भीषण अपघातात महाराष्ट्रातील ९ भाविकांचा मृत्यू

सामरिक तेलसाठा खोल खोल, चंडीखोल

गंभीर आहे…छाबड हाऊसच्या रेकीचे प्रकरण

राहुल गांधींना झालंय काय?

२०१९ मध्ये रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे हिंगोली जिल्हाध्यक्षपदासह विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात काम सुरू ठेवले. त्यांच्या राजकीय अनुभवाची आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत भाजपने मार्च २०२६ मध्ये त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रवास सुरू झाला होता. मात्र, हा प्रवास फार काळ टिकू शकला नाही.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारा एक महत्त्वाचा राजकीय चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात आलेले वडकुते यांनी विधानपरिषदेपासून राज्यसभेपर्यंत मजल मारली होती. त्यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रासह महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, समर्थक आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version