स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी अडथळे आणले जात असल्याचा आरोप स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी केल्यानंतर या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मस्क यांनी ‘धनदांडग्यांकडून’ अडथळा आणला जात असल्याचा आरोप केला असून, त्यांचा रोख भारतातील दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या उद्योगसमूहांकडे असल्याचे मानले जात आहे. मस्क यांनी आपल्या वक्तव्यात कोणत्याही उद्योगपतीचे किंवा कंपनीचे नाव घेतलेले नसले तरी, या आरोपाचा संबंध रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्याशी जोडला जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने मस्क यांचा आरोप फेटाळून लावला आहे. उपग्रह दळणवळण सेवांसाठी भारताची नियामक चौकट निष्पक्ष, पारदर्शक आणि भेदभावरहित असल्याचे संचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशावरून मस्क यांच्या आरोपांना केंद्र सरकारकडून स्पष्ट प्रत्युत्तर मिळाले आहे.
मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये, भारतीय जनतेवरील आपली मक्तेदारीची पकड कायम ठेवण्यासाठी काही धनदांडगे स्टारलिंकला रोखत असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यांनी या ‘धनदांडग्यां’ची नावे स्पष्ट केलेली नाहीत. त्यांच्या या पोस्टनंतर संचार मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट करणारे निवेदन जारी केले.
मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने उपग्रह दळणवळण सेवांसह सर्व दूरसंचार सेवांसाठी निष्पक्ष आणि भेदभावरहित प्राधिकृत चौकट तयार केली आहे. नॉन-जिओसिंक्रोनस सॅटेलाइट ऑर्बिटवर आधारित सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठी तीन ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) सेवांना दूरसंचार परवाने देण्यात आले आहेत. मात्र, परवान्याच्या अटींनुसार प्रत्येक कंपनीला सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या तिन्ही परवानाधारक कंपन्यांचे सुरक्षा मूल्यांकन सध्या सुरू असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले. संबंधित कंपनीची सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ती स्पेक्ट्रम वाटपासाठी अर्ज करण्याच्या पुढील टप्प्यावर जाऊ शकते. सध्या तिन्ही कंपन्या साधारणपणे एकाच नियामक टप्प्यावर असल्याने भारताची व्यवस्था अन्यायकारक किंवा भेदभावपूर्ण असल्याचा दावा निराधार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेस २०२६ मध्ये बोलताना स्टारलिंक बिझनेस ऑपरेशन्सच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर यांनी भारतासाठी कंपनीने विशेष सुरक्षा व्यवस्था तयार केल्याचे सांगितले. भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातच सुरक्षित ठेवला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, भारतात स्टारलिंकने २० गेटवे साइट्स उभारल्या असून शेकडो अँटेना असलेली जमिनीवरील पायाभूत सुविधाही तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
“मी उद्या इथे असेन की नाही, माहीत नाही”
पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींसह प्रियांका गांधींवर एफआयआर
अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील ‘नानां’चा अभिनय!
नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ड्रेयर यांच्या म्हणण्यानुसार, स्टारलिंक गेल्या पाच वर्षांपासून भारतीय नियामक, उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि ऑपरेटर्ससोबत काम करत आहे. भारताच्या सुरक्षाविषयक गरजा आणि नियामक अटी लक्षात घेऊन कंपनीने आपल्या कामकाजात आवश्यक बदल केले आहेत. भारतात व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रियपणे काम करत असल्याचेही त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
