दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) विवेक भगत यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात आता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (SC/ST Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगत यांनी संबंधित पत्रकारासह अन्य दोघांविरोधात जातिवाचक टिप्पणी, बदनामी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार केली होती. १३ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.
३ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेविरोधात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे एसीपी भगत हे बुटा सिंह राउंडअबाऊट परिसरात तैनात होते. भगत यांच्या तक्रारीनुसार, संबंधित महिला पत्रकाराने त्यांच्या जातीचा उल्लेख करून अपमानास्पद टिप्पणी केली आणि त्यांच्या एसीपी पदावरील नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले. या वक्तव्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी आपला अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असताना पत्रकाराने त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. त्यानंतर पत्रकार आणि तिच्या सहकाऱ्यांनी वारंवार जाब विचारून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपही भगत यांनी केला. सोशल मीडियावर आपली बदनामी करणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
“स्टारलिंक युद्धाचे साधन” उपग्रह इंटरनेट इराणच्या रडारवर
मेट्रो निर्बंधांपासून सुरक्षा व्यवस्थेपर्यंत; दिल्ली पोलिसांचे प्रतिज्ञापत्र
अमेरिकेत हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला
प्रथमच वडील मला थेट मैदानावर खेळताना पाहतील!
दरम्यान, संबंधित महिला पत्रकारानेही ३ ऑक्टोबरच्या घटनेबाबत भगत यांच्याविरोधात तक्रार केली होती. आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले जात असताना चित्रीकरण करत असताना भगत यांनी अयोग्य पद्धतीने स्पर्श करून धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे. ही तक्रार दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, या तक्रारीवर अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. भगत यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
